कॉंग्रेस आणि तृणमूलमधील दुरावा वाढण्याची चिन्हे

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी हातमिळवणी करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर तृणमूलच्या खासदारांनी कॉंग्रेसविषयी अतिशय आक्रमक भूमिका मांडली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील दुरावा वाढण्याची शक्यता बळावली आहे.
ममतांनी सोमवारी कोलकत्यात तृणमूलच्या आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी एकला चलो रे चा नारा दिला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल ताजा असतानाच ममतांनी जाहीर केलेला निर्णय चर्चेचा विषय बनला. साहजिकच, ममतांच्या भूमिकेविषयी पत्रकारांनी संसदेच्या आवारात तृणमूलच्या काही खासदारांना गाठून प्रश्न विचारले.
उत्तरादाखल त्या पक्षाचे खासदार किर्ती आझाद यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी दिल्लीतील आपच्या पराभवाचा ठपका कॉंग्रेसवर ठेवला. तसेच, कॉंग्रेस मित्रपक्षांचा विश्वासघात करत असल्याचा आरोपही केला. कॉंग्रेसच्या पाठिशी जनाधार राहिलेला नाही.
दिल्लीत आपशी हातमिळवणी केली असती; तर दोन्ही पक्ष सरकार स्थापन करू शकले असते. स्वतंत्र लढण्याचा परिणाम १४ जागांवर झाला. त्यामुळे आपचा पराभव झाला. इंडिया आघाडीत राहण्याचा अधिकार कॉंग्रेसला राहिलेला नाही, असे ते म्हणाले. त्या आघाडीचे नेतृत्व ममतांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी पुन्हा व्यक्त केली.
तृणमूलचे आणखी एक खासदार सौगत रॉय यांनी ममतांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. ममता आमच्या पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे पक्षाची भूमिका असते. भाजपशी लढण्यासाठी तृणमूल एकटा पुरेसा असल्याचे त्यांनी याआधी सिद्ध केले आहे. आम्ही पक्षहिताचा त्याग करून आघाडी बळकट करू शकत नाही, असे ते म्हणाले.





