IND vs ENG : कर्णधार गिलच्या चुकीमुळे संघाला बसला मोठा धक्का, चोरटी धाव घेणं पडलं महागात, पाहा VIDEO

IND vs ENG Shubman Gill Run Out Video Viral : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलच्या मैदानावर पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने केलेल्या एका चुकीमुळे मोठा धक्का बसला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या सत्रात २ बाद ७२ धावा केल्या होत्या. यावेळी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा गिल १५ धावांवर खेळत होता. पावसानंतर दुसऱ्या सत्रात खेळ पुन्हा सुरू झाला, पण गिलने एक चोरटी धाव घेण्याच्या नादात आपली विकेट गमावली.
गिलने इंग्लंडला भेट म्हणून दिली विकेट –
भारतीय डावातील २८ वे षटक सुरू झाले, तेव्हा इंग्लंडकडून गस एटकिन्सन गोलंदाजीला आला. गिलने पहिल्या चेंडूवर धाव घेतली नाही. दुसऱ्या चेंडूला त्याने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक चोरटी धाव घेण्यासाठी धावला. मात्र, एटकिन्सनने चपळाईने चेंडू उचलला आणि थेट यष्ट्यांवर मारला. पिचच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलेल्या गिलला परतण्याची संधीच मिळाली नाही. तो ३५ चेंडूत २१ धावा करून रनआऊट झाला आणि निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
गिल कसोटी कारकिर्दीत दुसऱ्यांदा रनआऊट –
React. Pick-up. Strike.
Clinical from Gus Atkinson 👌 pic.twitter.com/aM3RbgBvjp
— England Cricket (@englandcricket) July 31, 2025
शुबमन गिलने आतापर्यंत ३७ कसोटी सामने खेळले असून, त्याच्या कारकिर्दीत तो दुसऱ्यांदा रनआऊट झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही तो रनआऊट झाला होता. विशेष म्हणजे, या मालिकेत गिलने इंग्लंडविरुद्ध जेव्हा जेव्हा २० धावांचा टप्पा ओलांडला, तेव्हा त्याने शतक झळकावले होते. मात्र, यावेळी २१ धावांवर तो आपली खेळी पुढे नेऊ शकला नाही.
हेही वाचा – IND vs ENG : अंपायर धर्मसेनांचा वादग्रस्त इशारा? भारतीय चाहत्यांचा संताप, सोशल मीडियावर खळबळ, पाहा VIDEO
गौतम गंभीरही दिसला नाराज –
भारतासाठी हा धक्का मोठा होता, त्यामुळे कोच गौतम गंभीर पण गिलवर नाराज दिसला. हा मोठा असला तरी संघ अजूनही सामन्यात टिकून आहे. आता उर्वरित फलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या २९ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ८५ धावा आहे. साई सुदर्शन २४ धावांवर खेळत असून करुन नायरने अजून खाते उघडलेले नाही.





