Shrirang Barne – पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कडून पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात लगत परवानगी दिलेल्या सोसायट्यांची पाहणी करावी. एसटीपी चालू आहेत की नाही, हे तपासावे. थेट नदीत सांडपाणी सोडण्याऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करावेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कळविण्यात यावे. पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन करू नये, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या आहेत. पीएमआरडीए हद्दीतील विकासकामांचा खासदार बारणे यांनी गुरुवारी (दि. ७) बैठकीत आढावा घेतला. यावेळी आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस दक्षता अधिकारी अमोल झेंडे, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, सहआयुक्त रुपाली आवले, पुनम मेहता, हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, रिनाज पठाण, स्मिता कलकुटकी, अविनाश पाटील आदी उपस्थित होते. खासदार बारणे पुढे म्हणाले, पवना नदीच्या उगमापासून पिंपरी-चिंचवडपर्यंत नदी काठच्या गावाचे सर्वेक्षण करावे. नदी काठच्या गावात एसटीपी उभारावेत. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा. पीएमआरडीए. मावळमध्ये पर्यटकांची संख्या जास्त असून त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. लोहगडवरून विसापूरकडे जाणारा रस्ता विकसित करावा. सुरक्षाकठडे लावावेत. लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यात यावी. देहू, भंडारा डोंगर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त असते. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी. किवळे ते सांगवडेदरम्यान पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या. हिंजवडीतील अतिक्रमणांवर कारवाई करा भूमकर चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लक्ष्मी चौक – मारुंजी रोड परिसरात अनधिकृत विक्रेत्यांमुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी, वाकडकडून येणाऱ्या वाहनांमुळे लक्ष्मी चौकातील कोंडीत मोठी भर पडते. येथे अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर कारवाई करून चौक कोंडीमुक्त करावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी यावेळी केली.