शृंगऋषी वार्षिक यात्रा उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी सांगता

अहिल्यानगर – शिंगोरी (ता. शेवगाव ) येथे ऋषी परंपरेतून चालत आलेल्या शृंगऋषी वार्षिक यात्रा उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाला मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या गीतेच्या शिकवणीनुसार आयोजित या सप्ताहात भाविक संतांच्या मार्गदर्शनाने भक्ती आणि अध्यात्माचा संगम अनुभवत आहे.
हा सोहळा १२ एप्रिलपर्यंत चालणार असून, शनिवारी सामुदायिक हरिजागर आणि महाप्रसादाने सांगता होईल. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८:३० ते १०:३० हरिकीर्तन आणि नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.
या सप्ताहात ह.भ.प. प्रसाद महाराज जवरे, ह.भ.प. जगन्नाथ महाराज शास्त्री, ह.भ.प. बबन महाराज बटुळे, ह.भ.प. अशोक महाराज शास्त्री हे कीर्तनकार सेवा देणार आहेत. शनिवारी ह.भ.प. योगेश महाराज शास्त्री यांचे “काल्याचे कीर्तन” आणि महाप्रसादाने समारोप होईल. ग्रामस्थांनी नाश्ता आणि पंगतीसाठी योगदान दिले असून, अशोक धोंडीबा चेमटे, नागनाथ केशव घोंगडे, मारूती शिरसाठ यांच्यासह अनेकांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
समस्त ग्रामस्थ मंडळी आणि श्रीराम भजनी मंडळातर्फे सर्वांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






