Makrand Patil : ‘गोडवली’चा होणार कायापालट! मंत्री मकरंद पाटलांची मोठी घोषणा; ग्रामस्थांना दिलं आश्वासन
Makrand Patil : अध्यात्म आणि सामाजिक ऐक्यामुळे गोडवलीची वेगळी ओळख; 'आमदार दत्तक ग्राम योजने'द्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधणार.

Makrand Patil – “अध्यात्म, शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक ऐक्याच्या जोरावर गोडवली गावाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘आमदार दत्तक ग्राम योजने’च्या माध्यमातून या गावाचा कायापालट करण्याचा आमचा मानस असून, ग्रामस्थांनी दिलेले प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी शिदोरी आहे. गावाच्या उर्वरित विकासासाठी भविष्यातही निधीची कमतरता भासू देणार नाही,” असा ठाम विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे तपनेश्वर व श्री काळूबाई मंदिर परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ‘विठ्ठल रखुमाई मंदिर वर्धापनदिन’ सोहळ्याच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सभापती शकुंतला चोरमले, सदस्या वंदना भिलारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण भिलारे, रमेश चोरमले, डॉ तेजस्विनी भिलारे, महादेव दुधाणे, सरपंच शंकर कळंबे, सरपंच विष्णू मालुसरे, जनार्दन कळंबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या उत्सवानिमित्त हभप शारदा महाराज खोपडे यांचे कीर्तन आणि सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी व पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. ज्योती महाराज मतकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली, त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दानवलीचे आनंदराव शाहीर यांचा भारुड आणि भजनाचा कार्यक्रम भाविकांच्या विशेष पसंतीस उतरला. सायंकाळी महिला मंडळाच्या ताल नृत्य पथकाने विविध नाट्यप्रसंग सादर केले, तर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. अंकुश मालुसरे यांनी प्रास्ताविक केले. आर. डी. मालुसरे, योगेश मालुसरे यांनी आभार मानले.





