श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी ‘श्री गणनायक’ रथातून मार्गस्थ

Dagdusheth Ganpati Visarjan Rath | पुण्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विशेष आकर्षण असते. यंदा या उत्सवाचं 133 वं वर्ष आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणी करण्यात आली आहे. ढोल-ताशांच्या निनादात आणि फुलांच्या वर्षावात दगडूशेठ गणपतीचा रथ पुढे सरकत आहे.
विष्णूचे वाहन म्हणून श्री गणनायक रथावर समोरच्या बाजूला चार गरुड लावण्यात आलेले आहेत. 8 स्तंभांवर हा रथ उभारण्यात आला आहे. केरळ मधील मंदिरांना असते त्याप्रमाणे या रथाला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. केरळमधील मंदिरांप्रमाणे गोपुराही यामध्ये साकारण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 30 क्रिस्टल झुंबर या रथाला बसविण्यात आले आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या रथाला चार सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहेत. दरम्यान, आज सकाळपासूनच पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. हळूहळू एक एक गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे.





