Shrikant Shinde : माझे बाबा..! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट !

Shrikant Shinde | Eknath Shinde – विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपच्या जागा जास्त असल्याने, त्यांच्याच वाट्याला मुख्यमंत्रीपद जाईल अशी अटकळ बांधली जात आहे.
मात्र शिवसेना नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. अशातच काल राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपाच्या मुख्यमंत्र्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांनी ही घोषणा करत ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
दरम्यान, एकीकडे शिंदेंनी अशी घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे ही पत्रकार परिषद संपल्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास एकनाथ शिंदेंचे पुत्राने खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक भावनिक पोस्ट करत वडिलांच्या कार्यकाळाचं कौतुक केलं आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की, “मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो.
मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 27, 2024
त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा! असं ते म्हणाले आहेत.





