पुणे जिल्हा | श्री संत तुकाराम महाराज की जय

वाल्हे, (वार्ताहर) – आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकींच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या वाल्हे (ता. पुरंदर) नगरितील महर्षि वाल्मिकी मंदिरामध्ये तुकाराम बीज उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, श्री संत तुकाराम महाराज की जयच्या जयघोषात तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून भाविकांनी याची देही याची डोळा बीजेचा सोहळा अनुभवला. तर याप्रसंगी विठूनामाच्या गजरात वाल्मिकनगरी दंग झाली होती.
श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त महर्षि वाल्मिकी समाधी मंदिर स्थळी मागील सहा वर्षांपासून नाझरे कुटुंबियांच्या वतीने तुकाराम बीज उत्सव साजरा केला जातो. यावर्षी, फलटण येथील सुभाष महाराज पठाडे यांचे हरीकीर्तन पार पडला. पहाटे महर्षी वाल्मिकीऋषी समाधीसह संत तुकाराम यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली.
दुपारी बारा वाजता, समस्त ग्रामस्थ व उपस्थितांच्या साक्षीने, तुकाराम बीजेचा फुलांचा कार्यक्रम पार पाडला गेला.त्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी मोहन महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सोहळा पार पडला.





