दिल्लीतील तालकटोरा स्टेडीयमचे नाव बदलणार; ‘हे’ नाव दिले जाणार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्राप्रमाणेच आता दिल्लीतील भाजप सरकारने राज्यातील प्रसिध्द ठिकाणे, स्टेडियम आणि इतर संस्थांची नावे बदलण्याचे संकेत दिले आहेत. दिल्ली सरकारचे मंत्री आणि एनडीएमसी सदस्य प्रवेश वर्मा यांनी सांगितले की, ते नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेच्या (एनडीएमसी) पुढील बैठकीत तालकटोरा स्टेडियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणतील.
मंगळवारी नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर प्रवेश वर्मा यांचे हे विधान आले. यावेळी भाजप खासदार बांसुरी स्वराज आणि एनडीएमसीचे उपाध्यक्ष कुलजीत सिंह चहल उपस्थित होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आता तो एनडीएमसीसमोर प्रस्ताव ठेवण्याची तयारी करत आहेत.
यापूर्वी, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रचार करताना, त्यांनी नवी दिल्लीतील लोकांना स्टेडियमचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले होते. भाजपने नवी दिल्ली मतदारसंघातून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली होती.
प्रवेश वर्मा यांनी लोकांना सांगितले होते की जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर तालकटोरा स्टेडियमचे नाव महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर केले जाईल. त्यांनी असेही म्हटले होते की प्रत्येक विमानतळ, स्टेडियम आणि प्रमुख इमारतीचे नाव देशासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या देव किंवा शहीद यांच्या नावावर ठेवले पाहिजे.





