पुणे जिल्हा | शेतकरी हवालदिल : युरीयासाठी बळीराजाची भटकंती

वाल्हे, (वार्ताहर) – यावर्षी ऐन पावसाळ्यात वाल्हे (ता.पुरंदर) परिसरात पाऊस अतिअल्प प्रमाणात पडला आहे. यानंतर, बाजरीचा आगारा म्हणून ओळख असलेल्या वाल्हे परिसरात धुळ पेरणी मोठ्याप्रमाणावर करण्यात आली होती. मागील आठवड्यात तुरळक पाऊसांच्या सरी पडल्या असल्याने अनेकांच्या खरीप हंगामातील पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळण्यास मदत झाली होती.
यानंतर अनेकांनी खरीप पिकांची खुरपणी केल्यानंतर मागील तीन-चार दिवसांपासून पाऊस येत असल्याने पिकांना आवश्यकता असताना युरिया खताचा मात्र तुटवडा निर्माण झाला असून ऐन खरिपात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकर्यांवर युरियासाठी गावोगाव फिरण्याची वेळ आली आहे.
खरीप हंगामातील बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, चवळी, तूर, उडीद, वटाणा अशा पिकांसाठी युरिया खताची अत्यंत आवश्यकता असते. वेळेत युरिया खत उपलब्ध न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होतो. शेतकर्यांना शासनाने मुबलक प्रमाणात युरिया खते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कृषी विभाग व शासन खते उपलब्ध असल्याचा सांगत असतो. मात्र, प्रत्यक्ष दुकानांमध्ये युरिया खताचासाठा उपलब्ध नसल्याचे मागील काही दिवसांपासून दिसत असल्याचे वाल्हे व परिसरातील शेतकरीवर्गाने सांगितले.
शेती पिकांच्या वाढीसाठी असलेल्या युरिया खताला शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून वाल्हे, मांडकी, जेऊर या भागातील खत औषधे दुकानात युरिया खताचा तुटवडा जाणवत असून शेतकर्यांना अनेकदा युरिया उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे.
उसाची लागवड जेऊर, मांडकी, पिसुर्टी आदी गावात सुरू आहे. तसेच अनेक तरकारी पिके, भाजी पाला या पिकांच्या वाढीसाठी युरीया खत महत्त्वाचे असते. मात्र, अनेक दुकानात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकर्यांची गैरसोय होत असून, संबंधित विभागांच्या अधिकारीवर्गाने त्वरित लक्ष घालून युरीया खतांची टंचाई दुर करावी अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
खरिप पिकांसाठी अडीशे मेट्रिक टन युरिया आजच रिलीज करणार आहोत; लवकरच खतविक्रेत्यांकडे युरिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल; यासाठी बैठक बोलावली असून, जिथे- जिथे युरीया टंचाई आहे; अशा भागात युरीया खत विक्री दुकानदारांकडे पाठविण्यात येणार आहे. पुढील काळात देखील युरीयाची कमतरता भासू नये यासाठी युरियाचा साठा ठेवण्यात येणार आहे. – सूरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर तालुका





