पुणे जिल्हा | वरसगाव धरण क्षेत्रामध्ये मगरींचा वावर

वेल्हे (वार्ताहर) – वेल्हे व मुळशी तालुक्यातील तुडुंब भरलेल्या वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीजवळ बुधवार, दि. ७ रोजी पहाटे ४ ते ५ वाजता ठाण मांडून बसलेल्या ७ ते ८ फूट लांबीच्या मगरीला पकडण्यात राजगड वनविभाग व जलसंपदा विभागाला यश आले.
या मगरीला पकडताना अधिकारी, सुरक्षारक्षक व स्थानिक ग्रामस्थ यांची मगरीचा रुद्र अवतार पाहून व तिचे अंगावर धावून येणे हे पाहता अक्षरशः पळापळ झाली.
मंगळवार दि. ६ रोजी मध्यरात्रीपासून ते बुधवारी दि. ७ पहाटे तीन वाजेपर्यंत मगरीच्या थराराने परिसरात मोठी दहशत पसरली होती. या प्रकारामुळे धरण परिसरात काम करणारे जलसंपदा विभागाचे अधिकारी सुरक्षारक्षक व स्थानिक ग्रामस्थ यांची चांगलीच झोप उडाली.
मात्र, वनविभागाच्या राजगड विभागाने बावधन येथील रेस्क्यू पथकाच्या सदस्यांसह स्थानिकांच्या मदतीने सकाळी तीन ते चारचे दरम्यान मगरीला पिंजऱ्यात पकडण्यात यश मिळाले व तिला तिच्या मूळ आदिवास क्षेत्रात सोडण्यात आले. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी सुरक्षा रक्षक व स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मंगळवारी, रात्री ११ चे दरम्यान अकरावा वरसगाव धरणाचे मुख्य भिंतीवर सुरक्षारक्षक राहुल जाधव व कुणाल कुराडे पहारा देत उभे होते. त्यावेळी भिंतीवरील मुख्य प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटजवळील गवतात त्यांना काहीतरी हालचाल जाणवली.
म्हणून त्यांनी पाहिले तर त्यांना मोठ्या सापासारखा प्राणी दिसला. राहुल जाधव याने बॅटरीचे प्रकाशात पाहिले असता तेथे मोठी मगर असल्याचे दिसले.
याबाबतची माहिती त्यांनी वरसगाव धरणाचे शाखा अभियंता वीरेश राऊत व पानशेत धरणाचे शाखा अभियंता अनुराग मारके या वरिष्ठांना कळविताच त्यांनी तातडीने या ठिकाणी भेट दिली.
प्रवेशद्वार बंद केल्याने मगरीला बाहेर पडता येत नसल्याने ती चौताळून सुरक्षारक्षक यांच्याकडे असलेल्या बॅटरीच्या प्रकाशाकडे धाव घेत होती, असे स्थानिकांनी सांगितले.
याची माहिती मिळताच राजगड तालुका वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांनी तातडीने बावधन येथील पथकासह या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्याची मोहीम सुरू झाली.
रेस्क्यू पथकाच्या १५ जवानांसह वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे, वनरक्षक मनोज महाजन, सुनिता अर्जुन, स्वप्नील उंबरकर आधी दहा कर्मचारी तसेच वरसगाव धरणाचे सुरक्षा रक्षक या मगरीला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते.
प्रवेशद्वाराच्या भिंतीवर पुन्हा पुन्हा मगर चढत होती. अखेर पहाटे तीन ते चारचे दरम्यान मगरीला पकडण्यात यश आले.
वनविभागाकडून मगरीला पकडून तिला तिचा अधिवास असलेल्या क्षेत्रात सोडण्यात आले आहे. तिला पुन्हा वरसगाव धरणात सोडलेले नाही, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. – गोविंद लंगोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (ता. राजगड)
वरसगाव धरणात आढळलेल्या मगरीला पुन्हा वरसगाव धरणात सोडू नये, अशी विनंती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाला केली. त्यांचे व आमचे विभागाचे वरिष्ठांशी चर्चेनंतर वनविभागाने मगरीला वरसगावमध्ये सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. – अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण
मागील तीन ते चार वर्षांपासून वरसगाव धरणात मगरींचे वास्तव्य आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून आम्ही वारंवार तक्रारी करत आहोत. आज एक मगर पकडण्यात आली असली तरी अजून धरणात अनेक मगरी आहेत. म्हणून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. – देविदास हनमघर, सरपंच साईव बुद्रुक (वरसगाव, ता. राजगड)





