Pune : महापालिकेला मिळेना अनावरणाचा मुहूर्त

येरवडा – विश्रांतवाडी पोलीस स्टेशनजवळ मेंटल कॉर्नर परिसरात उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी शिल्पाचे काम पूर्ण होऊनही एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी हे शिल्प कापडाने झाकून ठेवण्यात आले आहे.
अनावरण, उद्घाटनाचा मुहूर्त ठरत नसल्यानेच महापालिका प्रशासनाकडून ही काळजी घेतली जात असली तरी दि.७ रोजी महर्षी वाल्मिकींच्या जयंतीदिनी तरी हे शिल्प खुले होइल, अशी नागरिकांना अपेक्षा होती ती फोल ठरली.
महापालिकेकडून महर्षी वाल्मिकी शिल्पासाठी २५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तत्पूर्वी याच शिल्पावर क्षेत्रीय कार्यालयाकडूनही १५ लाखाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. जवळपास सात वर्षांपासून रखडलेले काम पूर्णत्वास येऊनही केवळ उद्घाटनाअभावी हे शिल्प झाकुन ठेवण्यात आले आहे.
२०२४च्या लोकसभेच्या निवडणुकीअगोदर हे काम पूर्ण करण्यात आले. लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या तरी हे शिल्प कापडाने झाकलेल्या अवस्थेत आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी या शिल्पाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढला जाईल, अशी चर्चा आहे. मंगळवारी (दि.७ ) महर्षी वाल्मीकींची जयंती होती. मात्र, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला याचाही विसर पडला.
शिल्प उद्घाटनाआधीच झाकून ठेवल्याने त्याची झीज आणि दुरवस्था झाली असून पुन्हा त्याच्या दुरुस्तीसाठी निधी खर्च करावा लागणार का, असा संतप्त नागरिक करीत असून या शिल्पाचे लवकरात लवकर अनावरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रदिप रावते यांनी दिला असून त्याबाबतचे पत्र पालिकेला दिले आहे.
‘महर्षी वाल्मिकी शिल्पाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे, नागरिकांच्या भावनाचा आदर ठेवीत या शिल्पाचे लवकरच अनावरण, उदघाटन करण्यात येईल, यासंदर्भात प्रशासकीय चर्चाही झाली आहे.’ – राजेश गुर्रम, सहायक आयुक्त, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय.





