आशिया चषकादरम्यान (Shreyas Iyer) भारतात सुरू असलेल्या भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील अनऑफिशियल कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यापूर्वी भारत ‘अ’ संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) अचानक कर्णधारपद सोडत संघातून माघार घेतली आहे. यानंतर तो तातडीने मुंबईला परतला आहे. अय्यरच्या या निर्णयाने संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच्या जागी उपकर्णधार ध्रुव जुरेलला दुसऱ्या अनऑफिशियल कसोटीसाठी नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) का घेतली माघार? सूत्रांच्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे रजा मागितली आहे. त्याच्या मुंबईला परतण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अय्यरने दुसऱ्या सामन्यातील अनुपस्थितीबाबत निवड समितीला आधीच माहिती दिली होती. असेही म्हटले जात आहे की, निवडकर्ते आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार करत आहेत. मात्र, अय्यरच्या जागी भारत ‘अ’ संघात कोणत्याही नवीन खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. आयपीएल ते आशिया चषक आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना श्रेयस अय्यरने प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याची निवड न झाल्याने माध्यमांमध्ये आणि चाहत्यांमध्ये बरीच चर्चा झाली. भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील पहिल्या अनऑफिशियल कसोटीतही अय्यरला फारशी चमक दाखवता आली नाही. हा सामना मोठ्या धावसंख्येमुळे अनिर्णित राहिला. भारत ‘अ’ संघातील बदल श्रेयस अय्यरच्या माघारीव्यतिरिक्त, भारत ‘अ’ संघात आणखी एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसऱ्या अनऑफिशियल कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने 78 षटकांत 8 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. भारत ‘अ’ कडून मोहम्मद सिराजने सॅम कॉन्स्टासला बाद करत एक विकेट घेतली, तर फिरकीपटू मानव सुतारने 5 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यादरम्यान श्रेयस अय्यरच्या अचानक माघारीमुळे भारत ‘अ’ संघासमोर नेतृत्व आणि रणनीतीच्या दृष्टीने नवे आव्हान आहे. ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली संघ दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.