Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर आशिया कप खेळणार? ACCचा ‘हा’ नियम बदलू शकतो भारतीय फलंदाजाचं नशीब

Shreyas Iyer can be back in India Team for Asia cup 2025 : आशिया कप 2025 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली असून, यामध्ये दिग्गज फलंदाज श्रेयस अय्यरला स्थान मिळालेले नाही. या निर्णयाने चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि निराशा पसरली आहे. अनेकांना वाटले होते की श्रेयस अय्यर भारतीय संघात नक्कीच असेल, परंतु तसे झाले नाही. तरीही, आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) नियमांनुसार, श्रेयस अय्यरला तसेच यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळण्याची संधी अजूनही आहे.
एसीसीच्या नियमामुळे अय्यरला मिळू शकते संधी –
एसीसीच्या एका नियमाप्रमाणे, जर एखाद्या संघातील खेळाडूला दुखापत झाली किंवा संघ व्यवस्थापनाला खेळाडू बदलण्याची गरज वाटली, तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला सामील करता येते. यासाठी स्टँडबाय खेळाडूंमध्येच बदल करावेत असे बंधन नाही. या नियमामुळे स्टँडबाय यादीबाहेरील खेळाडूंनाही संधी मिळू शकते. त्यामुळे आशिया कप 2025 पूर्वी किंवा स्पर्धेदरम्यान जर भारतीय संघातील एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यरचे टी-20 मधील कामगिरी –
श्रेयस अय्यरने टी-20 क्रिकेटमध्ये नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या आकर्षक फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आयपीएल 2025 मध्ये त्याने पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवले आणि संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. अय्यरने 17 सामन्यांमध्ये 50.33 च्या सरासरीने 604 धावा केल्या, ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद ९७ धावा होता.
हेही वाचा – AUS vs SA : कॅमेरॉन ग्रीनने मोडला १९ वर्षांचा विक्रम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले सर्वात जलद शतक
भारताकडून टी-20 मध्ये त्याने 51 सामने खेळले असून, 30.66 च्या सरासरीने 1104 धावा केल्या आहेत. यामध्ये आठ अर्धशतके असून, त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 74 धावा आहे. एकूण 240 टी-20 सामन्यांमध्ये अय्यरने 34.08 च्या सरासरीने 6578 धावा केल्या असून, त्यात तीन शतके आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 147 धावा आहे. या दमदार कामगिरीमुळे श्रेयस अय्यरला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळण्याची आशा चाहत्यांना आहे. एसीसीच्या नियमांमुळे त्याच्यासह जैस्वाल आणि सिराज यांनाही संधी मिळण्याची शक्यता कायम आहे.





