Shreyas Iyer Statement : त्यांना सांगण्याची गरज नसते! २२६ चा पाठलाग केल्यानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य? नमन धीरचही केलं कौतुक
Shreyas Iyer Statement : क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध २२६ धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

Shreyas Iyer Praises Samson Abhishek and Naman Dhir After Historic Christchurch T20 Win : न्यूझीलंडविरुद्ध क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने २२६ धावांचे महाकाय आव्हान अवघ्या १९.४ षटकांत ६ गडी गमावून पार केले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर अत्यंत समाधानी आणि आनंदी दिसला. सामन्यानंतर बोलताना त्याने स्पष्ट केले की, या धमाकेदार विजयानंतर आता प्रवासाच्या थकव्याचे म्हणजेच ‘जेट लॅग’चे कोणतेही निमित्त उरलेले नाही. संघाचे संपूर्ण लक्ष या मालिकेत हाच आक्रमक आणि विजयी फॉर्म कायम ठेवण्यावर केंद्रित झाले आहे.
दव पडल्याने खेळपट्टी बदलली; किवी फलंदाजांनी अचूक फायदा घेतला –
न्यूझीलंडने उभारलेल्या २२५ धावांच्या विशाल धावसंख्येवर बोलताना कर्णधाराने खेळपट्टीतील बदलांवर प्रकाश टाकला. अय्यर म्हणाला, “नाणेफेक जिंकून गोलंदाजी करताना खेळपट्टी सुरुवातीला थोडी संथ वाटत होती आणि चेंडू थांबून येत होता. सुरुवातीला योग्य हार्ड लेन्थवर मारा करण्याऐवजी आमच्याकडून पुढे चेंडू टाकले गेले. मात्र, खेळ पुढे सरकताना मैदानावर मोठ्या प्रमाणात दव पडू लागले आणि खेळपट्टी फलंदाजीसाठी सपाट झाली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवत २२० पेक्षा जास्त धावा केल्या, जे कौतुकास्पद होते.”
संजू आणि अभिषेकच्या अनुभवावर पूर्ण विश्वास; पॉवरप्लेमध्ये ठरवली सामन्याची दिशा –
प्रत्युत्तरात २२६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना मिळालेल्या आक्रमक सुरुवातीचे श्रेय कर्णधाराने सलामी जोडीला दिले. श्रेयस म्हणाला, “२२० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये ८० ते ८५ धावांची गरज असते आणि संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांनी अगदी तशीच सुरुवात करून दिली. दोघेही अत्यंत अनुभवी खेळाडू असून त्यांना डाव कसा पुढे न्यायचा हे सांगण्याची गरज नसते. एकदा त्यांनी लय पकडली की ते संपूर्ण सामन्याची दिशा ठरवतात; त्यानंतर आमचे काम फक्त डाव सांभाळून सामना संपवणे एवढेच उरते.”
दबावाच्या क्षणी नमन धीरचा संयम; अष्टपैलू भूमिकेचे कौतुक –
सातव्या क्रमांकावर येऊन नाबाद राहणाऱ्या नमन धीरच्या शांत आणि संयमी खेळीचे श्रेयसने विशेष कौतुक केले. कर्णधार म्हणाला की, “नमन संघात असल्यामुळे गोलंदाजीत अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतात. विशेषतः डावखुरऱ्या फलंदाजांसमोर त्याची २ ते ३ षटके सामन्याचे पारडे फिरवू शकतात. गोलंदाजीव्यतिरिक्त, आज त्याने प्रचंड दबावाखाली दाखवलेला शांत स्वभाव आणि अचूक फटकेबाजी पाहणे एक अप्रतिम अनुभव होता. त्याच्या या अष्टपैलू खेळामुळे संघाची ताकद दुप्पट झाली आहे.”





