Abhishek Sharma Record : अभिषेक शर्मा बनला नवा ‘सिक्सर किंग’! रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत आणखी एका विश्वविक्रमाला घातली गवसणी
Abhishek Sharma Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या सामन्यात अभिषेक शर्माने रोहित शर्माचा एक खास वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

Abhishek Sharma Breaks Rohit Sharma World Record for Most Sixes in Powerplay T20I : न्यूझीलंडविरुद्ध क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने अवघ्या १२ चेंडूंत २ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांसह २९ धावांची वादळी खेळी केली. २२६ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना त्याने संजू सॅमसनसोबत (६७ धावा) अवघ्या ५.४ षटकांत ९३ धावांची तुफानी सलामी भागीदारी रचली. अभिषेकने खेळलेली ही छोटी खेळी ऐतिहासिक ठरली असून, त्याने माजी कर्णधार रोहित शर्माचा पॉवरप्लेमधील षटकारांचा जागतिक विक्रम मोडत टी-२० क्रिकेटच्या पॉवरप्लेचा ‘सिक्सर किंग’ होण्याचा मान मिळवला.
रोहित शर्माला टाकले मागे; पॉवरप्लेमध्ये ठोकले ९९ षटकार –
२६ वर्षीय अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० च्या पहिल्या ६ षटकांत म्हणजेच पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. अभिषेकच्या नावावर आता पॉवरप्लेमध्ये तब्बल ९९ षटकारांची नोंद झाली आहे. त्याने ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा ९८ षटकारांचा प्रदीर्घ विक्रम मोडला. या ऐतिहासिक यादीत न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन गुप्टिल (९७ षटकार) तिसऱ्या, युएईचा मुहम्मद वसीम (९५ षटकार) चौथ्या आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (९४ षटकार) पाचव्या क्रमांकावर आहे.
डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार; शफीकुल्लाहचा विक्रम उद्ध्वस्त –
Fast and furious, ft. Abhishek Sharma 🔥
Updates ▶️ https://t.co/ADfFnxXGzz
#TeamIndia | #NZvIND | @OfficialAbhi04 https://t.co/WZFRs6XIoF
— BCCI (@BCCI) October 22, 2026
क्राइस्टचर्चच्या मैदानावर डावाच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक मिळताच अभिषेकने मॅट हेन्रीला कव्हरच्या वरून थेट प्रेक्षक गॅलरीत धाडून षटकाराने डावाची सुरुवात केली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये डावातील पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा षटकार मारण्याचा आणखी एक आगळावेगळा विक्रम रचला. अभिषेकने कारकिर्दीत तब्बल ७ वेळा पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आहे. त्याने अफगाणिस्तानच्या शफीकुल्लाह शिनवारीचा (६ वेळा) विक्रम मोडला, तर सूर्यकुमार यादव (५ वेळा) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
संजू सॅमसनसोबत ९३ धावांची स्फोटक भागीदारी –
अभिषेकच्या या झंझावाती सुरुवातीमुळे भारताला २२६ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच आवश्यक धावगती राखता आली. मायकेल ब्रेसवेलच्या फिरकीवर बाद होण्यापूर्वी त्याने न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याची अक्षरशः पिसे काढली. अवघ्या १२ चेंडूंमध्ये त्याने केलेल्या या आक्रमक सुरुवातीमुळेच भारताला किवी भूमीवर ऐतिहासिक विजय मिळवून मालिकेत १-० अशी भक्कम आघाडी घेता आली





