Harry Brook Record : हॅरी ब्रूकने वादळी द्विशतक ठोकत मोडला शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Harry Brook Record : हॅरी ब्रुकने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावले आहे. त्याने शुबमन गिलचा विक्रम मोडला आणि इंग्लंडसाठी द्विशतक झळकावणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे.

Harry Brook Smashes Fastest ODI Double Century Breaks Shubman Gill Record : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय सामन्यात ब्रूकने वादळी फलंदाजीचे प्रदर्शन करत शानदार द्विशतक ठोकले. या धडाकेबाज खेळीसह त्याने भारतीय कर्णधार शुबमन गिलचा सर्वात वेगवान द्विशतकाचा जागतिक विक्रम मोडला आहे. इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. ब्रूकच्या या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध ४०० हून अधिक धावांचा महाकाय डोंगर उभारला.
अवघ्या ११४ चेंडूंत द्विशतक; गिलचा विक्रम एका झटक्यात उद्ध्वस्त –
हॅरी ब्रूक आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद दुहेरी शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवत त्याने अवघ्या ११४ चेंडूंत आपले द्विशतक पूर्ण केले. यापूर्वी भारताच्या शुबमन गिलने ११७ चेंडूंत द्विशतक झळकावून इतिहास रचला होता; मात्र ब्रूकने हा विक्रम आपल्या नावावर केला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी ब्रूकने ११६ चेंडूंत २१ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांच्या मदतीने २०२ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.
विल जॅक्सचे वादळ; इंग्लंडची ४२९ धावांपर्यंत मजल –
🚨WORLD RECORD BY HARRY BROOK 🚨
Fastest Double Century in ODI History!
114b – 𝗛𝗮𝗿𝗿𝘆 𝗕𝗿𝗼𝗼𝗸 𝘃𝘀 𝗦𝗟
117b – Shubman Gill vs WI
126b – Ishan Kishan vs BAN
128b – Glenn Maxwell vs AFG….seemore https://t.co/O9XVyjmPBs— 𝗩𝗞 𝟭𝟴 (@gurlabhsingh610) October 22, 2026
ब्रूकने एका बाजूने चौफेर फटकेबाजी करत दोनशे धावांचा टप्पा ओलांडला असताना इतर फलंदाजांनीही वेगाने धावा जमवल्या. विल जॅक्सने अवघ्या ३० चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ६६ धावांची स्फोटक खेळी केली, तर टॉम बँटनने ५१ चेंडूंत ५० धावांचे मोलाचे योगदान दिले. या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने ५० षटकांत ४ बाद तब्बल ४२९ धावांचा विशाल डोंगर उभारला.
बेन स्टोक्सचा रेकॉर्ड मोडला; मॅक्सवेलच्या पंगतीत स्थान –
या द्विशतकासह ब्रूकने २०२३ मध्ये बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या १८२ धावांचा इंग्लंडसाठीचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीला न येता (मिडल ऑर्डरमध्ये) द्विशतक झळकावणारा ब्रूक हा जगातील केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०२३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध अशी किमया केली होती.
तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व; ब्रूकचा ऐतिहासिक पराक्रम –
IT DOES NOT GET BETTER THAN THAT!
Harry Brook smashes the fastest double-century in ODI history, off 114 balls, breaking Shubman Gill’s record of 117 balls! 🔥 https://t.co/IoR3Fphr9Q
— Cricinfo (@cricinfo) October 22, 2026
हॅरी ब्रूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अत्यंत कमी कालावधीत अफाट यश मिळवले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक, कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक आणि आता कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक द्विशतक झळकावून त्याने तिन्ही फॉरमॅटवर आपली मोहोर उमटवली आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे जागतिक क्रिकेटमध्ये त्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.





