Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला संघात घेऊनही का खेळवलं जात नाहीये? किशन नसूनही संधी न देण्याचं कारण आलं समोर
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला अंतिम ११ मध्ये स्थान न दिल्याने क्रिकेट विश्वात वादाला तोंड फुटले आहे.

Why is Shreyas Iyer not getting a chance : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा ५० धावांनी पराभव झाला. या सामन्यात इशान किशन पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही, अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला अंतिम ११ मध्ये स्थान न दिल्याने क्रिकेट विश्वात वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियापासून ते आकाश चोप्रा सारख्या तज्ज्ञांपर्यंत सर्वजण बीसीसीआयच्या या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
श्रेयस अय्यरला का डावलले जात आहे?
श्रेयस अय्यरला संघात असूनही संधी न मिळण्यामागे एक तांत्रिक पण महत्त्वाचे कारण समोर आले आहे. श्रेयस अय्यर टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या मुख्य स्क्वॉडचा भाग नाही. टी-२० वर्ल्ड कप प्राधान्य: भारतीय संघ व्यवस्थापन सध्या केवळ अशाच खेळाडूंना संधी देत आहे, जे आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या नियोजनात आहेत.
आकाश चोप्रा यांचा संताप –
तिसऱ्या क्रमांकासाठी संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती तिलक वर्मा आहे आणि तो आता जवळपास तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे अय्यरला संधी मिळणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी यावर टीका करताना म्हटले की, “जर श्रेयस अय्यरला मैदानात उतरवायचेच नसेल, तर त्याला संघात कशासाठी ठेवले आहे? त्याच्या जागी एखाद्या युवा खेळाडूला संधी दिली असती, तर त्याला काहीतरी शिकायला मिळाले असते.”
‘गेम टाईम’ देण्यावर संघाचा भर –
You won’t play him but the love for this man keeps growing #Shreyasiyer #PBKS pic.twitter.com/TY0Y7H3A6r
— Aaryan (@SquadSadda32936) January 28, 2026
भारतीय संघ व्यवस्थापनाला वर्ल्ड कपमधील मुख्य खेळाडूंना जास्तीत जास्त सराव (Game Time) द्यायचा आहे. विशाखापट्टणम टी-२० मध्ये संघाने इशान किशनच्या जागी अर्शदीप सिंगला खेळवले. याचा अर्थ संघ एका फलंदाजाच्या कमतरतेसह मैदानात उतरला होता, जेणेकरून इतर फलंदाजांवर दबाव येईल आणि त्यांना अधिक चेंडू खेळायला मिळतील. मात्र, हा प्रयोग फसला आणि भारताचा टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळला.
फलंदाजांचे अपयश आणि काळजी –
चौथ्या टी-२० मध्ये २१६ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या (२ धावा) स्वस्तात माघारी परतले. शिवम दुबेने ६५ धावांची एकाकी झुंज दिली असली तरी, मधल्या फळीतील इतर फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.





