IND vs NZ : विशाखापट्टणममध्ये न्यूझीलंडने उघडलं विजयाच खातं! शिवम दुबेची अर्धशतकी झुंज ठरली व्यर्थ
IND vs NZ : झीलंडने दिलेल्या २१६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६५ धावांवर गडगडला.

IND vs NZ New Zealand beat India by 50 runs : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाला ५० धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या २१६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६५ धावांवर गडगडला. शिवम दुबेने झंझावाती फलंदाजी करत विजयाची आशा पल्लवित केली होती, मात्र तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला आणि भारताच्या हातातून सामना निसटला.
सलामीवीर फ्लॉप; टॉप ऑर्डरला ग्रहण –
२१६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवही केवळ ८ धावा करून माघारी परतला. संजू सॅमसनने २४ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली, मात्र मिचेल सँटनरने त्याला क्लीन बोल्ड केले. पहिल्या चार फलंदाजांपैकी कोणालाही ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही, ज्यामुळे भारतावर दडपण आले.
शिवम दुबेचा ‘रुद्रावतार’ अन् दुर्दैवी धावबाद –
मधल्या फळीत शिवम दुबेने मैदानात षटकारांचा पाऊस पाडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुबेने केवळ १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने २३ चेंडूत ६५ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये ७ उत्तुंग षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता.
शिवम दुबे वेगवान अर्धशतकानंतर धावबाद
मात्र, ज्यावेळी दुबे क्रीझवर होता, तेव्हा भारत जिंकेल असे वाटत होते. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. हर्षित राणाने मारलेला शॉट गोलंदाज मॅट हेन्रीच्या हाताला लागून थेट स्टंप्सला लागला आणि नॉन-स्ट्रायकर एंडला असलेला दुबे धावबाद झाला. दुबे बाद होताच भारताच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या.
मालिकेतील भारताचा पहिला पराभव –
भारताचा पूर्ण डाव १८.४ षटकांत १६५ धावांवर आटोपला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्या तीन सामन्यात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला या मालिकेत प्रथमच पराभवाचा धक्का बसला आहे, तरी देखील भारतीय संघ मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. आता मालिकेचा शेवटचा आणि पाचवा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे.





