Ujjwal Nikam – मला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रात्री ८ वाजेच्या दरम्यान फोन आला आणि ते मला म्हणाले की मराठीत बोलू की हिंदीत बोलू? त्यानंतर मी हसलो, तर ते देखील हसले. मग ते म्हणाले की उज्ज्वलजी मी तुम्हाला फोन यासाठी केला आहे, की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तुमच्यावर काही महत्वाची जबाबदारी सोपवू इच्छित आहेत. तुम्ही ती जबाबदारी स्वीकाराल का? मग मी त्यांना सांगितले की हो. पण कोणती जबाबदारी? ते म्हणाले की राज्यसभेची, अशी माहिती ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. वकील उज्ज्वल निकम यांची आज राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किस्सा उज्ज्वल निकम यांनी सांगितला. तसेच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी मराठी भाषेत संवाद साधल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात उज्ज्वल निकम यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना माहिती दिली. उज्ज्वल निकम म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण आहे. कारण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून माझी राज्यसभेवर नियुक्ती करणे हे माझ्या आणि कुटुंबीयांसाठी अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप उत्कृष्ट मराठी बोलतात. ते महाराष्ट्रात भाषण करताना मराठीत सुरुवात करतात आणि नंतर हिंदीत भाषण करतात. तसेच भाजपने मला जेव्हा लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास मी यावेळी सार्थ करून दाखवेन. अर्थात राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कायद्याचा अभ्यास आणि कायद्याचे विश्लेषण आणि या देशाच्या ऐक्यासाठी, देशातील लोकशाही आणि संविधान कशा पद्धतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असे उज्ज्वल निकम मुलाखतीत सांगितले.