Prithviraj Chavan : रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना दोष द्यायचा की….; कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओवरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल

Prithviraj Chavan : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात राज्यातील प्रश्नांवरील चर्चेबरोबच सत्ताधारी पक्षातील विधानसभा सदस्यांचे कारमान्यामुळे सरकारची गोची झाली. विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना चक्क कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रुमी खेळण्यात दंग असल्याचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
काल पुण्यात अजित पवार यांनी येत्या सोमवारनंतर त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता कोकाटेंची मंत्री पदाची खुर्ची काढून घेतली जाणार का याची चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयी प्रतिक्रिया देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना दोष द्यायचा की ऑनलाईन रमी सुरु करणाऱ्या मोदी सरकारला दोष द्यायचा ? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसची आत्ताच्या सत्ताधाऱ्यांशी तुलनाच होऊ शकत नाही, हे अगदी निर्ढावलेली लोक आहेत, अशी टीका करत यांना कशानेच काही फरक पडत नाही, असे म्हणत चव्हाण यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
ऑनलाइन रमीमधून कर गोळा करण्याची व्यवस्था सरकारने केली आहे, मंत्री पदावरची माणसंही ऑनलाइन जुगाराचा मोह टाळू शकत नाहीत, ऑनलाइन जुगारामुळे पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा की नाही? हे त्यांना ज्यांनी मंत्री केलं त्यांनी ठरवावं.
फॅसिस्ट प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असल्याचे विधान चव्हाण यांनी केले आहे. विधिमंडळाला एक दर्जा आहे, लोकशाहीच्या मंदिरात जे चालू आहे ते लज्जास्पद आहे. सत्ताधारी पक्षांकडून बेशिस्त वर्तन होत आहे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.





