सनातन धर्मावरील हल्ल्याबाबत मी बोलायला नको का?; पवन कल्याण यांचा प्रकाश राज यांना प्रश्न

विजयवाडा – तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ करण्यावरून दोन दिग्गज कलाकारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ज्येष्ठ कलाकार प्रकाश राज यांनी तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणात ११ दिवसांचे प्रायश्चित करणारे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर टिप्पणी केली.
अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, प्रिय कल्याण हा प्रकार त्या राज्यात झाला ज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. कृपया तपास करा, दोषींना हुडका आणि त्यांच्यावर कारवाई करा. तुम्ही याला सनसनाटी विषय का करत आहात, त्याला राष्ट्रीय मुद्दा का करत आहात? देशात अगोदरच खूप सामुदायिक तणाव आहे.
त्याला उत्तर देताना पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना विचारणा केली आहे की मी या विषयावर का बोलायला नको? मी तुमचा आदर करतो प्रकाश राज. पण जेंव्हा धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा येतो तेंव्हा तो दोन्ही बाजूंनी असला पाहिजे. तुम्ही माझ्यावर टीका का करत आहात ते मला समजले नाही. सनातन धर्मावरील हल्ल्याच्या संदर्भात मी बोलू शकत नाही का?
प्रकाश राज यांनी हा धडा शिकला पाहिजे की चित्रपटसृष्टीतील अथवा अन्य कोणीही कोणताही विषय सहजपणे घ्यायला नको. सनातन धर्माच्या विषयावर मी अत्यंत गंभीर आहे. सनातन धर्म माझ्यासाठी सगळ्यांत महत्वाचा असून प्रत्येक हिंदुने आपली जबाबदारी घेतली पाहिजे. कोणत्या दुसऱ्या धर्माबाबत असे झाले असते तर आंदोलन सुरू झाले असते.
काही दिवसांपूर्वी पवन कल्याण यांनी सांगितले होते की, राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते की, तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची (फिश ऑइल, डुकराची चरबी आणि म्हशीची फॅट) भेसळ आढळून आल्याने आम्ही सर्वजण अतिशय अस्वस्थ झालो आहोत.
पवन कल्याण म्हणाले, कदाचित संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची वेळ आली आहे.





