Veterinary Clinic : पशू वैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा; पशुपालक हवालदिल
Veterinary Clinic : वेळेवर डॉक्टर नसल्याच्या तक्रारी; शेतकऱ्यांवर खासगी उपचारांचा आर्थिक बोजा

कान्हे – तालुक्यातील कामशेत येथील शासकीय पशू वैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा असून पशू वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध राहत नसल्याच्या तक्रारी पशुपालकांकडून होत आहेत.
परिणामी चिखलसे, नायगाव, येवलेवाडी, खडकाळा, नाणे, पाथरगाव, वळक बुधवडी, कामशेत, ताजे, पिंपोळी गावांतील शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत असून त्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय पशू वैद्यकीय सेवेबाबत पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हा अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. अनेक कुटुंबे गायी, म्हशी, बैल, शेळ्या आणि इतर पाळीव जनावरांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करतात.
अशा परिस्थितीत जनावरांचे आरोग्य चांगले ठेवणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र कामशेत येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक औषधी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
पशुपालकांच्या म्हणण्यानुसार, जनावरे आजारी पडल्यावर उपचारासाठी शासकीय दवाखान्यात गेल्यास अनेकदा औषधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. काही वेळा डॉक्टर उपलब्ध नसल्याने तासनतास प्रतीक्षा करावी लागते. गंभीर अवस्थेतील जनावरांसाठी हा विलंब धोकादायक ठरत असून वेळेत उपचार न मिळाल्यास जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दवाखान्यातून औषधे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजारातून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहेत. तसेच खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना घरी बोलावण्यासाठी स्वतंत्र मानधन द्यावे लागते. यामुळे आधीच शेतीमालाला योग्य दर मिळत नसताना पशुपालनाचा खर्चही वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.
पशुपालकांनी प्रशासनाकडे कामशेत येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी आणि नियमितपणे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व प्रकारची जीवनावश्यक औषधे, लसी, मिनरल मिक्स्चर, कॅल्शियम सप्लिमेंट्स, इंजेक्शने आणि उपचार साहित्याचा पुरेसा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध साथीचे आजार वाढण्याची शक्यता असल्याने पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र कामशेत येथील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून औषधांचा तुटवडा दूर करावा आणि नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील पशुपालकांकडून होत आहे.
‘जनावरांच्या आरोग्यासाठी मिनरल मिक्स्चर हे अत्यंत आवश्यक पूरक अन्न आहे. त्यामध्ये विविध खनिजे, प्रथिने आणि पोषक घटक असतात. शासकीय दवाखान्यात ते उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला बाजारातून महागात खरेदी करावे लागते. त्यामुळे पशुपालनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाने तातडीने औषधसाठा उपलब्ध करून द्यावा.’ – शांताराम येवले, शेतकरी, नायगाव
Pune District : आळंदीतील बसस्थानक अजूनही बंदच; प्रवाशांचे अतोनात हाल




