Grass Shortage : मावळात तणनाशकांचा विळखा! नैसर्गिक गवत नष्ट झाल्याने पशुधन धोक्यात; धक्कादायक वास्तव समोर
Grass Shortage : शेतातील तण मारण्याच्या नादात उपयुक्त चाराही जळून खाक; मावळ तालुक्यातील पशुपालकांना आता विकतच्या चाऱ्याचा आधार.

Grass Shortage – मावळ तालुक्यात तणनाशकांच्या वाढत्या वापरामुळे पशुपालनावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. शेतातील तण नष्ट करण्यासाठी होणारी रासायनिक फवारणी आता नैसर्गिक गवतावरही घाला घालत आहे. परिणामी हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून पशुधन संकटात सापडले आहे. मावळ तालुक्यातून पवना आणि इंद्रायणी या दोन प्रमुख नद्या वाहत आहेत.
तसेच बंधारे आणि धरणेही मोठ्या प्रमाणात असल्याने हा ’पाणीदार तालुका’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने येथील बहुतांश भागात शेती हिरवीगार दिसते. पूर्वी शेताच्या बांधावर, धुऱ्यावर आणि मोकळ्या जागांवर मुबलक गवत उगवत असे. हेच गवत जनावरांसाठी मुख्य आहार ठरत होते. मात्र, आता तणनाशकांच्या फवारणीमुळे हे गवत पूर्णपणे नष्ट होत आहे.
शेतातील प्रत्येक कोपऱ्यात फवारणी केल्याने उपयुक्त वनस्पतीही जळून जात आहेत. याचा थेट परिणाम पशुपालकांवर झाला आहे. जनावरांसाठी नैसर्गिक चारा उपलब्ध नसल्याने महागडा चारा विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी जनावरे कमी केली आहेत किंवा गोठे रिकामे केले आहेत.
काही वर्षांपूर्वी मावळात गवताचे बाजार भरायचे. गवत विक्री हा अनेकांचा रोजगार होता. मात्र, आता गवतच उरत नसल्याने हे बाजार बंद पडले आहेत. भुईमूग, तुरीचा कुटारही दुर्मिळ झाला आहे. पशुपालकांना पर्याय म्हणून पेंढा किंवा विकतचा चारा घ्यावा लागत आहे. देवस्थानच्या जमिनींवरही आता नगदी पिके घेतली जात आहेत.
त्यामुळे चाऱ्यासाठी राखीव जागा कमी झाली आहे. ही परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. पशुपालक सुदाम घुगे यांनी सांगितले की, पूर्वी बांधावर सहज गवत मिळायचे. आता सर्वत्र तणनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा मिळत नाही. पशुपालन टिकवणे कठीण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, तणनाशकांचा अतिरेक जमिनीच्या आरोग्यावरही परिणाम करतो.
मातीतील उपयुक्त घटक नष्ट होतात. दीर्घकालीन शेतीसाठी हे घातक ठरू शकते. एकूणच, मावळातील पारंपरिक शेती आणि पशुपालनाची साखळी तुटण्याच्या मार्गावर आहे. वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर पशुधन घटण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.





