Dairy Farming – राज्यात दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसायाकडे वळला आहे. मात्र, पशुपालनामध्ये ६० ते ६५ टक्के खर्च हा केवळ चाऱ्यावर होत असल्याने, खर्चात बचत करण्यासाठी आणि उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता टिकवण्यासाठी तालुक्यातील दूध उत्पादकांचा कल ‘मुरघास’ बनवण्याकडे वाढला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात हिरवा चारा म्हणून मका पिकाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. मका योग्य वेळी कापून, त्याची कुट्टी करून ती मोठ्या पिशव्यांमध्ये हवाबंद साठवली जाते. या प्रक्रियेत चारा आंबवला गेल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये टिकून राहतात. परिणामी, हा चारा अधिक स्वादिष्ट आणि चवदार बनत असल्याने जनावरे तो आवडीने खातात. अशी होते मुरघासाची निर्मिती मुरघासासाठी मका पीक फुलोऱ्यात असतानाच त्याची कापणी केली जाते. यंत्राच्या साहाय्याने त्याचे अर्धा ते एक इंचाचे बारीक तुकडे करून मोठ्या बॅगेत किंवा खड्ड्यात दाब देऊन भरले जातात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किमान २१ दिवस चारा हवाबंद ठेवला जातो. त्यानंतर हा पौष्टिक चारा जनावरांच्या आहारात समाविष्ट केला जातो. या पद्धतीमुळे चाऱ्याची नासाडी टळते आणि साठवणूक करणे सोपे जाते. “दुग्ध व्यवसायात सातत्य राखण्यासाठी जनावरांना दररोज हिरवा चारा मिळणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता भासते, अशा वेळी मुरघास खाऊ घालून दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवता येते. यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहते आणि खर्चातही मोठी बचत होते.” – रामभाऊ भोसले, दूध उत्पादक शेतकरी