Pune District : आळंदीतील बसस्थानक अजूनही बंदच; प्रवाशांचे अतोनात हाल
Pune District : यंदा ६ ते ९ जुलैदरम्यान ढगफुटीसदृश पावसाने इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला होता. या पाण्याच्या प्रचंड वेगाने नदीकाठच्या परिसराला मोठा फटका बसला.

आळंदी : श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थानावेळी आलेल्या मोठ्या पुरामुळे आळंदीतील चारही पूल पाण्याखाली गेले होते. पूर ओसरून आठ ते दहा दिवस झाले असून माउलींच्या पालखीने पंढरीच्या दिशेने अर्धा पल्ला पार केला आहे. मात्र, पुराच्या तडाख्यामुळे आळंदीतील बसस्थानक अजूनही बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात आळंदीतील पूल पाण्याखाली जातात, मात्र पूर एका दिवसात ओसरतो. यंदा ६ ते ९ जुलैदरम्यान ढगफुटीसदृश पावसाने इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला होता. या पाण्याच्या प्रचंड वेगाने नदीकाठच्या परिसराला मोठा फटका बसला.
या समस्येची दखल घेत आळंदीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी बसस्थानक व स्कायवॉकची प्रत्यक्ष पाहणी करून अस्वच्छतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी “येत्या चार दिवसांत बसस्थानकाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल व संपूर्ण परिसराचे दर्जेदार काँक्रिटीकरण केले जाईल,” असे आश्वासन दिले.
याशिवाय पुलावरील मुख्य वाहिनी दुरुस्त करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथ उपलब्ध करून द्यावा आणि बंद असलेला स्कायवॉक लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
या पाहणीवेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधवराव खांडेकर, शिवसेनेचे उत्तमराव गोगावले, काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप नाईकरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, संजय वडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदेश तापकीर, शिरीष कारेकर, रोहन कुऱ्हाडे, योगीराज सातपुते, सामाजिक कार्यकर्ते दीपक काळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवाशांना पायपीट; स्कायवॉकही बंद
आळंदी नगरपरिषदेजवळील बसस्थानकाची पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी दुर्दशा झाली असून तेथे चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बसस्थानकात एकही बस न येता, पुलापलीकडील ‘वाय जंक्शन’ जवळील एसटी स्टँडवरून बस सोडल्या जात आहेत. परिणामी वारकरी, नागरिक व ज्येष्ठांना बस पकडण्यासाठी शहराबाहेर पायी जावे लागत आहे. तसेच पुरामुळे ‘स्कायवॉक’चीही दुरावस्था झाल्याने तो बंद ठेवावा लागला आहे, यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.





