धक्कादायकः “स्वाइन फ्लू’च्या लसीचा तुटवडा

गरज 500 ची, उपलब्ध आहेत 30
यशवंतराव चव्हाण रूग्णालयामध्ये सध्या रेबीज प्रतिबंधक लसीचा देखील तुटवडा जाणवत आहे. रूग्णालयामध्ये 30 लस (व्हायल्स) उपलब्ध आहेत. शंभर रुग्णांसाठी त्या पुरू शकतात. रुग्णालयात दर महिन्याला 500 रेबीज प्रतिबंधक लस लागतात. दरम्यान, रूग्णालय प्रशासनातर्फे मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडे एक हजार लसींची मागणी करण्यात आलेली आहे.
पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अचानक बदल होताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणामुळे आणि अधून-मधून येणाऱ्या पावसांच्या सरींमुळे स्वाइन फ्लू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दर तीन दिवसाला एक स्वाइन फ्लू सदृश रुग्ण आढळत असतानाच महापालिकेच्या सर्वच रूग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूवरील लस उपलब्ध होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
स्वाइन फ्लूवरील लस प्रामुख्याने गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रूग्णांना दिल्या जातात. लसचा पर्याय म्हणून सध्या टॅमीफ्ल्यूच्या गोळ्या दिल्या जात आहेत. केवळ स्वाईन फ्लूच नव्हे तर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयात कॅल्शियमच्या गोळ्या, रेबीज प्रतिबंधक लस यांचा तुटवडा जाणवत आहे.
सध्या बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी महापालिका रुग्णालयात तब्बल सतराशेहून अधिक तापाचे रुग्ण उपाचारासाठी आले होते. त्यापैकी 41 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून आजपर्यंत 108 जणांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. अशी परिस्थिती असतानाही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूवरील लसचा तुटवडा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.
महापालिका रूग्णालयांसाठी आवश्यक असलेल्या स्वाइन फ्लू लसीची मागणी वैद्यकीय विभागाकडून मध्यवर्ती औषध भांडार विभागाला गुरूवारी (दि. 17) करण्यात आली. चव्हाण रूग्णालयामध्ये टॅमी फ्ल्यूच्या 75 एमजीमधील 3 हजार गोळ्यांचा साठा उपलब्ध आहे. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या सिरपच्या 89 बाटल्यांचा साठा आहे. यशवंतराव चव्हाण रूग्णालय हे पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यामुळे या रूग्णालयांमध्ये शहराच्या विविध भागातून तसेच शहरालगतच्या भागातून देखील रूग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे रूग्णालयावर रूग्ण सेवेचा अतिरिक्त ताण पडतो.
रूग्णालयामध्ये सध्या कॅल्शियमच्या गोळ्या उपलब्ध नाहीत. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कॅल्शियम सिरपच्या 170 बॉटल मात्र उपलब्ध आहेत. कॅल्शियम सिरप महिन्याला 500 बॉटल लागतात. त्यानुसार त्या उपलब्ध होत असल्याची माहिती रूग्णालयातील औषध भांडार विभागाकडून मिळाली. महिलांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात कालावधीत लागणाऱ्या या गोळ्या खासगी औषधालयातून विकत घ्याव्या लागत आहेत. तसेच, हाडांच्या विकारावरील उपचारासाठी दाखल रूग्णांना देखील या गोळ्या बाहेरूनच मागवाव्या लागत आहेत. कॅल्शियमच्या 2 लाख गोळ्यांची मागणी रूग्णालय प्रशासनाकडून मध्यवर्ती औषध भांडार विभागाला करण्यात आली आहे.
महापालिका रूग्णालयांसाठी 12 लाख कॅल्शियमच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठादार यांना यापूर्वीच आदेश दिलेले आहेत. आठवडाभरात या गोळ्या मिळतील. स्वाइन फ्लूच्या दीड हजार लस उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय विभागाकडून शुक्रवारी मागणी आली आहे. शासनाकडून संबंधित लसीचा पुरवठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रेबीज प्रतिबंधक लसीचा पुरवठा मर्यादित असल्याने ही लस मिळावी, यासाठी हाफकीन व अन्य दोन संस्थांशी पत्रव्यवहार केला आहे.
– मंगेश चितळे, सहायक आयुक्त, महापालिका.
रूग्णालयासाठी आवश्यक कॅल्शियम गोळ्यांची मागणी मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडे केलेली आहे. आठवडाभरात या गोळ्या उपलब्ध होतील. स्वाइन फ्लूवरील लस प्रामुख्याने गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रूग्णांना दिली जात आहे. ही लस मिळावी, यासाठी मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडे मागणी केलेली आहे. महिनाभरात त्यांच्याकडून ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेबीज प्रतिबंधक लसीचा पुरवठा मर्यादित असल्याने अन्य रूग्णालयांकडून ती उपलब्ध करून दिली
जात आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय पदव्युत्तर संस्था





