Pune: १८ वर्षांवरील नागरिकांना बीसीजी लस

पुणे – जिल्ह्यात क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना आता बीसीजीची लस देण्यात येणार असून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विकास वडगाये यांनी ही माहिती दिली. क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी जन्मत: सर्व लहान मुलांना देण्यात येते. मात्र आता नागरिकांमध्ये टीबीचा धोका वाढत चालल्यामुळे आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. ही लस देण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यांना भविष्यात टीबी होण्याचा धोका आहे. त्यांनाच ही लस प्राधान्याने देण्यात येणार आहे़
या लसीचा वापर प्रौढांमधील क्षयरोग प्रतिबंधासाठी करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठरावीक ग्रामीण जिल्ह्यामध्ये व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रौढांना बीसीजी लस सप्टेंबर महिन्यापासून देण्यात येणार आहे. यासाठी प्रौढांमधील काही गट ज्यांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त आहे त्यांना प्रथमत: ही लस देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात बीसीजी लस देण्यासाठी आशा सेविकांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात एकूण ७ लाख ५० हजार ७०४ जणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ लाख ३२ हजार २३२ जणांना लस घेण्यासाठी संमती दिली आहे. लसीकरणासाठी जे लाभार्थी संमती देतील, त्यांनाच ही लस देण्यात येणार आहे.
लस देण्याकरिता गावागावांत, उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड यापैकी एक ओळखपत्र आवश्यक असेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सचिन देसाई आणि डॉ. विकास वडगाये यांनी केले आहे.





