माळेगाव बुद्रुकमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर; नागरिक भयग्रस्त, लसीचा तुटवडा गंभीर

माळेगाव : माळेगाव बुद्रुकमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस बळावत चालला आहे. दररोज चार ते पाच नागरिक कुत्र्यांच्या चाव्याचे बळी ठरत असून, गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावर चालणंही धोक्याचं ठरतंय विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी.
चाव्याच्या घटनांनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी रेबीज लस (ए.आर.व्ही) देण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीचा तुटवडा गंभीर स्वरूप धारण करत आहे.
परिणामी, अनेक नागरिकांना बारामतीपर्यंत लसीसाठी पायपीट करावी लागत आहे, जे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोठं मानसिक आणि आर्थिक ओझं ठरतंय. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र होत असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
नगरपंचायतीकडून उपाययोजना सुरू: निर्बिजीकरण आणि लसीकरणाचा दावा
“याआधीही भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना राबवल्या आहेत. सध्या निवीदा प्रक्रिया सुरू असून,भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. तसेच रेबीज प्रतिबंधासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अँटी रेबीज लस दिली जाणार आहे.”
– बालाजी लोंढे, मुख्याधिकारी, माळेगाव नगरपंचायत.
आरोग्य विभागाचा दावा: लसीकरणाची व्यवस्था बारामतीत
“प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या प्रत्येक रुग्णाला अँटी रेबीज लस देण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या वेळी लस उपलब्ध नसेल, तर रुग्णांना बारामती येथे लसीकरणासाठी पाठवले जाते. लसीचा तुटवडा होणार नाही यासाठी आमचं लक्ष आहे.”
– मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.





