Tukaram Mundhe : पुणे विद्यापीठाच्या मेसमधील धक्कादायक वास्तव! तुकाराम मुंढेंचा आदेश अन् एफडीएची धडक कारवाई
Tukaram Mundhe : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंट्रल कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. नागरिकांना त्यांच्या तक्रारी करण्यासाठी विभागाकडून टोल फ्री क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. यातूनच मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या असून, त्या तक्रारींची पडताळी करून कारवाई केली आली आहे. अशातच आता पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंट्रल कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृह चालवणाऱ्या ‘मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्विसेस’चा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला. अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृह चालवणाऱ्या ‘मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’ची 16 जून रोजी एफडीएच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. या तपासणीत अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि अनेक त्रुटी असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

Tukaram Mundhe : पुणे विद्यापीठाच्या मेसमधील धक्कादायक वास्तव! तुकाराम मुंढेंचा आदेश अन् एफडीएची धडक कारवाई
अधिकाऱ्यांना आढळल्या अनेक गंभीर त्रुटी (Tukaram Mundhe)
तपासणीदरम्यान कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगळे साठवले जात नसल्याचे आढळले. तसेच स्वयंपाकघरात तापमान नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून आले. अन्न तयार होणाऱ्या परिसरात दीर्घकाळापासून पेस्ट कंट्रोल न केल्यामुळे कीड-कीटकांचा धोका वाढल्याचेही अधिकाऱ्यांना आढळून आले. याशिवाय स्वयंपाकघरातील अस्वच्छता, पाण्याच्या गुणवत्तेची नोंद नसणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे रेकॉर्ड उपलब्ध नसणे अशा गंभीर त्रुटीही समोर आल्या.
हेही वाचा : Vidhan Parishad Election : राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; कोणाचे पारडे जड?
विद्यार्थ्यांकडून अनेकदा तक्रारी (Tukaram Mundhe)
गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. अन्नपदार्थांमध्ये अळी, कीड, कॉकरोच तसेच माश्या आढळल्याच्या तक्रारींमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
सोशल मीडियावरही या तक्रारींना मोठ्या प्रमाणात वाचा फुटल्यानंतर एफडीएने याची गंभीर दखल घेत तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार करण्यात आलेल्या धाडीत अनेक त्रुटी उघड झाल्यानंतर अखेर भोजनगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था (Tukaram Mundhe)
दरम्यान, मेस कंत्राटदाराचा परवाना निलंबित झाल्यामुळे सेंट्रल कॅन्टीनसह सर्व आठ हॉस्टेल मेस आणि सेंट्रल रिफेक्टरीची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. आवश्यक सुधारणा पूर्ण करून पुन्हा तपासणी झाल्यानंतरच भोजनगृह सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना जेवणासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी थेट विद्यापीठात धाडसी कारवाई करणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांचे सर्व विद्यार्थ्यांनी जाहीर आभार मानले आहेत.





