Vidhan Parishad Election : राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; कोणाचे पारडे जड?
Vidhan Parishad Election : आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी

Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उर्वरित ११ जागांसाठी आज गुरुवार, १८ जूनला मतदान होणार आहे. राज्यातील १७ जागांवर निवडणूक घोषित करण्यात आली होती.
त्यातील सहा जागा बिनविरोध निवडून आल्याने आता उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
बिनविरोधचा फंडा कायम
महाविकास आघाडीतील उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, यामुळे या निवडणुकीची मतदानपूर्वी अधिक चर्चा झाली. उर्वरित जागांवरही महायुतीच्याच उमेदवारांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, या निवडणुकीमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये, यासाठी महायुतीतील पक्षांनी खबरदारी घेतली असून महायुतीचा अधिकृत उमेदवार सोडल्यास इतर कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नये, अशा आशयाचे व्हिप बजावण्यात आले आहेत.
कोण करणार मतदान?
तसेच, या व्हिपविरोधात जाऊन कुणी मतदान केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निवडणुकीकरता महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मतदान करणार आहेत.
दरम्यान, सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या ११ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.
अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील थेट लढती रंगल्या असून काही मतदारसंघांमध्ये तिरंगी संघर्षही पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, शिंदेसेनेकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन टायगरचे पडसाद देखील निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. Vidhan Parishad Election
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार?
यंदाच्या निवडणुकीत ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे विजयी झाले आहेत.
रिंगणात असलेले उमेदवार –
सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे वसंतराव देशमुख यांच्यात सामना आहे. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे आणि बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे आमनेसामने आहेत.
नाशिक मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे रिंगणात असले तरी माघार घेतलेल्या गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांची नावेही मतपत्रिकेवर कायम असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे. Vidhan Parishad Election
हेही वाचा:






