Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई ! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द
विद्यापीठाच्या मुख्य मेसमध्ये (उपहारगृह) गंभीर त्रुटी आढळल्याने, एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी या मेसचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत थेट निलंबित (रद्द) केला आहे.

Tukaram Mundhe : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा दणका दिला आहे. विद्यापीठाच्या मुख्य मेसमध्ये (उपहारगृह) गंभीर त्रुटी आढळल्याने, एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी या मेसचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत थेट निलंबित (रद्द) केला आहे.
तसेच संबंधित कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नवीन कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत ही मेस बंद राहणार असून, सध्या या कॅन्टीनबाहेर “८ नंबर मेस सुरू आहे” असा फलक लावण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर थेट मुंढेंना पत्र
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठातील मेस आणि कॅन्टीनमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यासाठी घातक असणारे अन्न मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. सोशल मीडियावरून संताप व्यक्त केल्यानंतर, काही विद्यार्थ्यांनी थेट एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना पत्र लिहून या गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती आणि कारवाईची मागणी केली होती.
तपासणीत आढळल्या धक्कादायक त्रुटी
विद्यार्थ्यांच्या पत्राची दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने विद्यापीठातील मेसवर धाड टाकली होती. तेथील जेवणाचे आणि पाण्याचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीत मेसच्या व्यवस्थापनाबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर आल्या:
अस्वच्छता आणि निष्काळजीपणा
अन्नसाठा योग्य प्रकारे न ठेवणे, तापमान नियंत्रणाचा अभाव आणि अन्न हाताळणी प्रक्रियेत प्रचंड निष्काळजीपणा आढळून आला.
कीटक नियंत्रण नाही
मेस परिसरात कीटक नियंत्रणाची (Pest Control) कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती.
नोंदींचा अभाव
पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही नोंद तिथे आढळली नाही.
वैद्यकीय तपासणी नाही
मेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली नसल्याचेही स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांकडून तुकाराम मुंढेंचे आभार
या सर्व गंभीर त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकत होता. हीच बाब लक्षात घेऊन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी तडकाफडकी ही मेस बंद करण्याचे आणि कंत्राटदाराला घरचा रस्ता दाखवण्याचे आदेश दिले. एफडीएच्या या धडक आणि तत्पर कारवाईमुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून आयुक्त तुकाराम मुंढे यांचे विशेष आभार मानले आहेत.






