शिवशाही बस-कंटेरचा भीषण अपघात; एकाच जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी

पुणे : पुण्यात शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून चालक, वाहक आणि सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय एकनाथ भायदे असे मृत्युमुखी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. इथून जवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-पुणे एसटीच्या समोर आला.त्यामुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात चालक, वाहक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका वृत्तवाहिनीला याविषयी माहिती दिली.
अपघातात बस आणि कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ज्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहक आणि प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.
क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त शिवशाही बस आणि कंटनेरला हटवण्यात आले. परंतु या दरम्यान अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.





