Shivrajyabhishek Sohala : दुर्गराज रायगड सजला! ५ आणि ६ जूनला रंगणार ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Shivrajyabhishek Sohala : पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधीच्या अभिवादनाने सोहळ्याला होणार सुरुवात; राजसदरेवर रंगणार 'जागर शिवशाहिरांचा' आणि पारंपरिक युद्धकलांची प्रात्यक्षिके.

Shivrajyabhishek Sohala – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने दुर्गराज रायगडावर शुक्रवार, दि. 5 व शनिवार, दि. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास युवराज संभाजी छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला आणि सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही दाहीदिशा फिरली. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील या सुवर्णक्षणाची स्मृती सदैव जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने दरवर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदाही विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार, दि. 5 रोजी दुपारी 3.30 वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन करून, सोहळ्यास प्रारंभ होईल. त्यानंतर शिवभक्त नाणे दरवाजामार्गे गडावर चढाई करतील. गडपूजनानंतर 4.30 वाजता होळीचा माळ येथे महाराष्ट्रातील पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जातील. सायंकाळी 7 वाजता ढोलवादन, लेझीम, वारकरी संप्रदायाकडून टाळ-मृदंगाचा गजर केला जाईल.
रात्री 8 वाजता राजसदरेवर ‘जागर शिवशाहिरांचा…स्वराज्याच्या इतिहासचा’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री 9 वाजता गडदेवता शिरकाईदेवी मंदिरात गोंधळ, वारकरी संप्रदायाचे कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी (दि. 6) सकाळी 7 वाजता ध्वजारोहणाने मुख्य सोहळ्याला प्रारंभ होईल. 7.30 वाजता शाहिरी कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पालखीचे राजसदरेवर आगमन, युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अभिषेक आणि राजसदरेवरील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे.
संभाजी छत्रपती शिवभक्तांना मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर भव्य पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात येईल. जगदीश्वर मंदिर येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी 12.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन करून, सोहळ्याची सांगता होईल. या ऐतिहासिक उत्सवास शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे जिल्हा सदस्य रोहित जाधव, मयूर सूर्यवंशी, अॅड. गणेश चोरगे, किरण बोराटे यांनी केले आहे.






