शिवगर्जनेसाठी रायगड सज्ज … ! शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाची महा तयारी, सुरक्षा आणि सुविधा पक्क्या

अलिबाग : शिवप्रेम, इतिहासाची साक्ष आणि महाराजांचा गौरव अनुभवण्यासाठी आज रायगड किल्ल्यावर शिवभक्तांचा महापूर उसळणार आहे. ६ जून रोजी तारखेनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दीड लाखांहून अधिक शिवप्रेमी गडावर दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती स्वतः उपस्थित राहणार आहेत.
प्रशासनाची भक्कम तयारी
शिवभक्तांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
- १ लाख पाण्याच्या बाटल्या व ५ हजार किलो तांदळाची जेवणाची व्यवस्था
- १५ बेडचे रुग्णालय गडावर, पाचाड येथे ५ बेडचा ICU विभाग, आणि १९ तात्पुरते दवाखाने
- १५०-१५० पोर्टेबल स्वच्छतागृहे पाचाड व गडावर
- ५०० लिटरच्या ५० पाण्याच्या टाक्या, ५ जलशुद्धीकरण यंत्रे
- पावणेदोन हजार पोलीस बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथकांसह
- १७ उद्घोषणा केंद्रे, २२ मंडप, ७ एलईडी स्क्रीन
- १२ वाहनतळ आणि १०० एसटी बसेस पाचाड ते पायऱ्या मार्गासाठी
राज्यभरातून शिवभक्तांचा जनसागर
या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी रायगडावर दाखल होत आहेत. ९ जून रोजी तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असून, त्या दिवशी २५ ते ३० हजार शिवभक्तांची गर्दी होणार आहे.
गडावरील ऐतिहासिक सोहळा पाचाडमधील नागरिकांनाही पाहता यावा म्हणून शासनाकडून एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. शिवप्रेम, राष्ट्राभिमान आणि इतिहासाचे जतन करणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज आणि शिवभक्त उत्साहित आहेत.
पाचाड येथे ७ स्क्रीन
गडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाचाड येथील नागरिकांना पाहता यावा यासाठी शासनाकडून ७ स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. शिवभक्तांच्या सोयीसाठी २२ ठिकाणी मंडप लावण्यात आले आहेत. बंगळूरू येथील चेंगरा चेंगरीची घटना लक्षात घेतली तर रायगड किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांच्या गर्दीचे व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.





