Raigad Fort Pre-wedding Shoot: किल्ले रायगडावर प्री-वेडिंग शूटप्रकरणी संताप; मंत्री आदिती तटकरे यांची जिल्हाधिकारी, एसपींना महत्वाची सूचना
Raigad Fort Pre-wedding Shoot: या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला व बालविकास मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Raigad Fort Pre-wedding Shoot: किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसरात प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी, तमाम शिवप्रेमींचे तीर्थस्थान असलेल्या किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या घटनेबद्दल मी स्वतः रायगडचे जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे व पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांना…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 14, 2026
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला व बालविकास मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा – 1 मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक; नियमभंग केल्यास परवाना रद्द
मंत्री तटकरे यांनी हा प्रकार निंदनीय असल्याचे सांगत किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून किल्ले परिसरात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले आहे. तसेच, किल्ल्यावर प्री-वेडिंग शूट, फोटोशूट किंवा कोणतेही वैयक्तिक कार्यक्रम करण्यास मनाई करणारे सूचना फलक लावण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.
View this post on Instagram
यासंदर्भात रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाल्याचे तटकरे यांनी नमूद केले. जिल्हा व शासन स्तरावर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, समाधीस्थळ परिसरात २४ तास पोलीस बंदोबस्त असतानाही हे छायाचित्रण कसे झाले, तसेच यासाठी परवानगी देण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सुनील तटकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पुरातत्व विभागाने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.





