शिवराजने पंचांना गोळ्या घालायला हव्या होत्या; ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आक्रमक

अहिल्यानगरमध्ये काल (दि. ०२) ६७ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील कुस्तीपटू पृथ्वीराज मोहोळ मानाची गदा पटकावण्याच्या मानकरी ठरला. या सेमी फायनल सामन्यादरम्यान महाराष्ट्र केसरीला गोंधळाचे गालबोट लागले. पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर ओढली आणि त्यांना लाथ मारली. आता या वादावर ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, खरं तर काल जो प्रकार घडला तो चुकीचा होता. पण मी चुकीचा इतकाच म्हणेल की, पंचांना शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराज राक्षेवर जो अन्याय झाला आहे, त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. पुढे बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले की, जो अन्याय शिवराजसोबत झाला आहे तोच अन्याय २००९ मध्ये माझ्यासोबतही झाला होता.
शिवराजची कुठलीही चूक नाही
पुढे बोलताना म्हणाले, शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो. पण, पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि सहा मिनिटांची कुस्ती दीड तास सुरु ठेवल्यामुळे मी जो अन्याय सहन केला होता, तोच अन्याय शिवराजला सहन करावा लागला आहे. कुस्ती झाली आहे की नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. या प्रकरणात शिवराजची कुठलीही चूक नाही, असं स्पष्ट मत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
….म्हणून झाला गोंधळ?
पृथ्वीराजने शिवराजला चितपट केले. पण त्याला हा निर्णय मान्य नव्हता. शिवराजच्या मते त्याची पाठ पूर्णपणे गादीवर टेकलेली नव्हती. यामुळे पंचांच्या निर्णयावर शिवराजसह त्याचे प्रशिक्षक यांनी आक्षेप घेऊन निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे अपिल केले. मात्र, नियमानुसार कुस्ती चितपट झाल्यास त्या निर्णयावरील अपिल स्वीकारले जात नाही. यामुळे या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. त्यामुळे शिवराज राक्षे प्रचंड चिडला आणि त्याने एका पंचांची कॉलर ओढली आणि लाथही मारली. त्यामुळे स्पर्धा काही काळ थांबली होती. याबाबत शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.





