Satara | शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार

सातारा, (प्रतिनिधी)- सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे येथून कोण निवडून येणार हे आता जवळपास स्पष्ट आहे.
मात्र, तरीही विरोधकांपुढे गाफील न राहता बूथ लेव्हलपासून ते वॉर्डपर्यंत एकीने काम करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्याने महाराष्ट्रातून निवडून आणणार अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी आज दिली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या येथील सुरुची या निवासस्थानी त्यांचे सातारा व जावळी तालुक्यातील समर्थक व नगर विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे पदाधिकारी यांची बैठक शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी व डॉ. अच्युत गोडबोले, माजी नगरसेवक प्रकाश बडेकर, अविनाश कदम, व्यंकटराव मोरे, रणजित साळुंखे, कालिंदी गोडबोले, प्रवीण पाटील तसेच पार्लमेंटरी बोर्डाचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये 2019 च्या निवडणुकीत मतदानाच्या घटलेल्या टक्क्यावर चर्चा झाली.
कार्यकर्त्यांनी बूथ लेव्हलपासून ते प्रत्येक वॉर्डामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांना वैयक्तिक गाठीभेटी घेऊन मतदान स्लिपा पोहोचवणे तसेच त्यांना शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देणे मतदानासाठी शक्य तेवढी त्यांना मदत करणे अशा जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांनी वाटून घेण्याचे नियोजन ठरले. पाच वर्षे आपण शिवेंद्रराजेंकडे वेगवेगळी कामे आणत असतो आणि ती करुन घेत असतो.
आता वेळ शिवेंद्रसिंहराजे यांच्या विधानसभा निवडणुकीची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तपणे सुरुची येथे येऊन जबाबदारीप्रमाणे आपापली कामे खांद्यावर घ्यावीत, असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले.
प्रत्येक वार्डातील जास्तीत जास्त नागरिक मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे आणि त्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवणे यासाठी रणनीती निश्चित करण्यात आली. यावेळी प्रकाश गवळी, प्रकाश बडेकर, व्यंकटराव मोरे, डॉ. अच्युत गोडबोले, रणजित साळुंखे यांनी विचार व्यक्त केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पार्लमेंटरी बोर्डासमोर म्हणाले की विधानसभा निवडणुका आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीत आजी- माजी व भावी नगरसेवकांची प्रचारादरम्यान स्पर्धा होऊ शकते.
त्यामुळे अशी कोणती स्पर्धा लक्षात न घेता विरोधक आपल्यासमोर असताना आपण आपल्या सातारा जावळी मतदारसंघातील राज्य शासनाच्या माध्यमातून राबवलेल्या कामाचा जास्तीत जास्त प्रचार करावा.
तसेच विरोधकांनी गेल्या पाच वर्षात सातारा जावळी मतदारसंघासाठी काय केले? महायुतीच्या माध्यमातून काही विरोधक थेट सत्तेमध्ये असतानाही त्यांनी काहीही केले नाही.
सातारा तालुक्यात विकासाची जेवढी कामे झाली त्यापेक्षा काकणभर जास्त कामे जावळी तालुक्यात झाली आहेत. ही कामे करताना आपणा सर्वांना सोबत घेऊनच काम केलेले आहे.
सुरुची दारे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत खुली असतील, अशी ग्वाही देत शिवेंद्रसिंहराजे यांनी एकीने कामाला लागण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.
साताऱ्यातील दोन्ही आघाड्या आज एकत्र
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होताच आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपले संपर्क अभियान गतिमान केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा व जावळी मतदारसंघात नेहमीप्रमाणे आपला संपर्क दौरा कायम ठेवला आहे.
आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्यादृष्टीने येथील लेक व्ह्यू हॉटेल मंगल कार्यालयात उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा व जावळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत असून सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. साताऱ्यातील पहिल्याच मेळाव्यामध्ये नक्की कोणती रणनीती स्पष्ट होणार याची उत्सुकता आहे





