Tukaram Mundhe : ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’: तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत
Tukaram Mundhe : अन्यायाविरोधात भूमिका घेण्याचे महत्त्व स्पष्ट करताना मुंढे यांनी हस्तिनापूरच्या दरबारातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचे उदाहरण दिले.

Tukaram Mundhe : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. मात्र, सध्या ते एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. समाजात अन्याय होत असताना केवळ प्रेक्षक म्हणून न पाहता, योग्य वेळी आवाज उठवणे आणि कृती करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे.
अन्यायाविरोधात भूमिका घेण्याचे महत्त्व स्पष्ट करताना मुंढे यांनी हस्तिनापूरच्या दरबारातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचे उदाहरण दिले. हा प्रश्न केवळ दुर्योधनापुरता मर्यादित नव्हता, तर सभेत उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रभावशाली व्यक्तीशी संबंधित होता, असे त्यांनी नमूद केले.
भीष्मांसारख्या व्यक्तीकडे मूल्यांची कमतरता नव्हती; मात्र निर्णायक क्षणी कृती करण्याची कमतरता होती, असा मुद्दाही त्यांनी मांडला. आजच्या काळात परिस्थिती बदलली असली, तरी अन्यायाकडे पाहण्याची मानसिकता फारशी बदललेली नाही, असे त्यांनी सूचित केले.
‘बदल व्हायला हवा’ असे म्हणणारे अनेकजण असतात. मात्र, तो बदल घडवण्याची जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी दुसऱ्याने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जाते. याच मानसिकतेवर भाष्य करताना मुंढे यांनी ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’ या म्हणीचा दाखला दिला.
समाजात परिवर्तन घडवण्यासाठी एखाद्या महान व्यक्तीची प्रतीक्षा करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योग्य वेळी आवाज उठवणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाभारत कोणत्याही चमत्कारामुळे नव्हे, तर कुरुक्षेत्रावरील संघर्षानंतर संपले, याची आठवण करून देत आजच्या समाजातही कोणीतरी चमत्कार करेल, अशी अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने आपल्या वाट्याची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, नेटिझन्सकडून त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.






