Shiv Sena UBT: आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाचा मास्टरप्लॅन तयार! शिवसेना भवनात बैठक; राजकीय वातावरण तापणार?
Shiv Sena UBT: कागदावर नव्हे तर थेट बूथपातळीवर काम करा; मतदार याद्यांची अचूकता अन् बीएलओ नियुक्तीबाबत ठाकरे गटाचे पदाधिकार्यांना निर्देश.

Shiv Sena UBT – आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने संघटनात्मक बांधणीला वेग देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. 7) मुंबईतील शिवसेना भवन, दादर येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत सातारा जिल्ह्यातील संघटना आगामी निवडणुकांसाठी अधिक सक्षम करण्यासह मतदार याद्या, बूथपातळीवरील यंत्रणा आणि पदाधिकार्यांच्या जबाबदार्यांवर विशेष भर देण्यात आला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेत्या अॅड. सुषमा अंधारे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक उद्धव कदम, महाले यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुकांच्या आधी बूथ बांधणीला प्राधान्य
सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तयार होत असताना पक्षसंघटना कागदावर न राहता प्रत्यक्ष बूथपातळीवर सक्रिय करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मतदार याद्यांची तपासणी व नोंदणी, मतदारांशी थेट संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने पदाधिकार्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील समीकरणांना विशेष महत्त्व असते.
त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची ताकद निर्णायक ठरते. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावांत पक्षाची संघटनात्मक उपस्थिती मजबूत करण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. त्यासाठी स्थानिक प्रश्नांवर आंदोलन, नागरिकांशी संपर्क आणि कार्यकर्त्यांची सक्रियता वाढविण्याची दिशा बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
सातार्यातील पदाधिकार्यांना जबाबदारीची जाणीव
सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी बैठकीस उपस्थित राहून आगामी काळात संघटनात्मक विस्तारासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची भूमिका स्पष्ट केली .विशेषतः मतदार याद्यांची अचूकता, बीएलओ नियुक्ती आणि बूथनिहाय नियोजन या बाबींकडे पक्षाने गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा बँक आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या आधी ठाकरे गटाची ही संघटनात्मक तयारी कितपत प्रत्यक्ष राजकीय ताकदीत रूपांतरित होते, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत
संघटनात्मक बांधणीसोबतच स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. केवळ निवडणुकीपुरते कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय न ठेवता सातत्याने जनसंपर्क वाढविणे, नागरिकांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणे आणि त्या माध्यमातून पक्षाचा जनाधार मजबूत करणे, अशी व्यापक रणनीती आखली जात असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले.






