Sanjay Raut: “सरकारला मनोज जरांगे यांना मारायचंय, त्यांचा उपयोग संपला”; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut: मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस

Sanjay Raut: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा बारावा दिवस आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टला उपोषण सुरु केले होते. उपोषणामुळे गेल्या काही दिवसां त्यांची प्रकृती देखील खालावली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीवर ते ठाम आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण न गेल्यामुळे मनोज जरांगे यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यांच्या शरीरातील शुगरची पातळीही कमी झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
“सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचंय. त्यांची लढाई आणि संघर्ष हा त्यांच्या गळ्याचा फास बनला आहे. सरकारच्या दृष्टीने जरांगे पाटील यांचा उपयोग संपला आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाचा आणि लढ्याचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन घेतला आणि आता जरांगेंना वाऱ्यावर सोडले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. या काळात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. हे अत्यंत अमानुष आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असतील तर…
मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू असल्याचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटीलयांनी स्पष्ट केले होते. जे निर्णय करणे आवश्यक होते ते आपण केलेले आहेत. त्यात त्यांचे समाधान होत नाही. आपण प्रयत्न करत आहोत पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनात काही अजूनही प्रश्न असतील तर ते आपण सोडवतच आहोत.
शेवटी मराठा समाजाच्या व्यापक हिताकरता आपण निर्णय करत आहोत. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे,” असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. सरकारच्या या भूमिकेवरूनच संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा:






