शिवसेना पुन्हा निशाण्यावर.! ‘माझ्याकडे एक पेनड्राईव्ह आलाय…’; मनसेच्या ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट निर्माण झाले. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणामुळं संघर्ष टोकाला गेला असल्याचं दिसून येत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टीका केल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील पुन्हा एकदा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष पणे टीका केली आहे. यावेळी देशपांडे यांनी एक मोठा दावा केल्याचं दिसून आलं.
संदीप देशपांडे म्हणाले, “तीन दिवसांपूर्वी मी माझ्या शाखेत नसताना एक व्यक्ती आला आणि माझ्या ऑफीसमध्ये काही कागदपत्रं तसंच पेनड्राईव्ह सोडून गेला आहे. करोना काळात विरप्पन गँगने मुंबईकरांना कसं लुटलं याचे पुरावे त्यामध्ये असून, मी सोमवारी हे सर्व पुरावे सादर करणार असल्याचं’, यावेळी संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता संदीप देशपांडे यांच्या या पेनड्राईव्ह मुळे कोणता नवीन राजकीय भूकंप होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटातील आमदार, खासदारांसोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. इतकेच नाही तर विरोधी पक्षातील लोकंही शिंदे गटात सहभागी होत असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे.





