Shiv Jayanti 2026 : पारंपरिक शिवजयंती हरवत चालली! डीजे-डॉल्बी आणि बुलेटच्या आवाजाने नागरिक त्रस्त
Shiv Jayanti 2026 : व्याख्याने आणि मर्दानी खेळांची जागा आता मोठ्या आवाजातील संगीताने घेतली; ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी केवळ दिखाव्याची स्पर्धा सुरू असल्याची चर्चा.

Shiv Jayanti 2026 – छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणजे आदर्श, शिस्त आणि प्रेरणेचा सोहळा. मात्र, गेल्या काही वर्षांत या उत्सवाचे स्वरूप वेगाने बदलत असून पारंपरिकता हरवत चालल्याचे विदारक चित्र दिसत आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी आता डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज आणि बुलेटचा गोंगाट चर्चेचा विषय ठरत आहे.
या वाढत्या कोलाहलामुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण हवालदिल झाले असून, प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरत आहे. आमच्या काळात शिवजयंती म्हणजे शिस्त आणि इतिहासाची जाणीव करून देणारा सोहळा होता. आज मात्र उत्सवाचे व्यापारीकरण आणि ध्वनी प्रदूषण वाढले आहे, अशा शब्दांत एका ज्येष्ठ नागरिकाने आपली नाराजी व्यक्त केली.
या गोंगाटाचा सर्वाधिक फटका वृद्ध, लहान मुले आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या वाढत्या प्रकारांकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे. डीजे-डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आणणे, सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करणे आणि पुन्हा एकदा पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे काळाची गरज बनली आहे. शिवजयंतीचा मूळ डामडौल आणि पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने नियमावलीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
ऐतिहासिक वारसा की आवाजाचे प्रदर्शन?
काही वर्षांपूर्वीपर्यंत गावागावांत शिवजयंती अत्यंत साधेपणाने पण तितक्याच भव्यतेने साजरी होत असे. ढोल-ताशे, लेझीम, मर्दानी खेळ, पोवाडे आणि व्याख्यानांच्या माध्यमातून शिवरायांचा देदीप्यमान इतिहास घराघरांत पोहोचवला जात असे. पारंपारिक वेशभूषेतील मिरवणुका सामाजिक ऐक्याचे प्रतीक होत्या. मात्र, आज अनेक ठिकाणी या सांस्कृतिक मूल्यांची जागा मोठ्या आवाजातील संगीताने घेतली आहे.
बुलेटचे फटाके
सध्या शिवजयंतीच्या निमित्ताने काही तरुणांकडून बुलेट मोटारसायकलींचे सायलेंसर बदलून फटाक्यांसारखे आवाज काढण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्री उशिरापर्यंत चालणारा हा धिंगाणा आणि डीजेच्या दणदणाटाने शांतता भंग होत आहे. उत्सवाचा मूळ हेतू बाजूला पडून केवळ दिखाव्याची स्पर्धा सुरू झाली आहे, अशी खंत जाणकार व्यक्त करत आहेत.





