प्रभात वृत्तसेवा जुन्नर – युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा मान मिळालेल्या शिवनेरी किल्ल्यासह सातवाहनकालीन नाणेघाटाची ऐतिहासिक माहिती पर्यटकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने केली आहे. येत्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या डिजिटल हेरिटेज ऑडिओ सेल्फ गायडेड टूर योजनेचे उद्घाटन करावे, अशा विनंतीचे पत्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला देण्यात आले आहे. सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी यांनी सांगितले की, शिवनेरीला युनेस्कोचे मानांकन मिळाल्यापासून देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीचे संवर्धन काम प्रगतीपथावर असले, तरी त्यापूर्वीच पर्यटकांना हेडफोनच्या माध्यमातून किल्ल्याची सविस्तर माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी ऑडिओ गाईड योजनेचा शुभारंभ आणि युनेस्को शिवनेरी लोगोचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची मागणी करण्यात आली आहे. या डिजिटल गाईडमध्ये किल्ल्याची ऐतिहासिक घडामोडी, भौगोलिक रचना आणि बांधकाम शैलीची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल. लोहगड ठरला पहिला किल्ला डिजिटल हेरिटेज ऑडिओ सेल्फ गायडेड टूर योजनेत लोहगड हा राज्यातील पहिला किल्ला ठरला आहे. प्रवेशद्वारापासून सुरू होणाऱ्या या ऑनलाइन टूरबरोबर नकाशानुसार फिरताना पर्यटकांना प्रत्येक बुरुज, माची, तटबंदीवर घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती जाणून घेता येणार आहे. सध्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये हा ऑडिओ वॉक होत आहे. अपूरी चुकीची माहिती जायला नको वारसा स्थळांविषयी नागरिकांचे वाढते कुतूहल लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत पर्यटकांना पुस्तिका किंवा इंटरनेटवरील माहितीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, अनेकदा पर्यटकांना अपुरी किंवा चुकीचे संदर्भ असलेली माहिती दिली जाते. याची दखल घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई शाखेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वारसा पर्यटन अधिक माहितीपूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.