Shirur Police Station: शिरूर पोलीस ठाण्याचा कारभार नवीन जागेतून! जीर्ण इमारतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दखल
Shirur Police Station: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नवीन इमारतीतील स्थलांतराचा प्रश्न मार्गी; पुणे ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेबद्दल नागरिकांकडून समाधान.

Shirur Police Station – शिरूर पोलीस ठाण्याच्या जुन्या व जीर्ण इमारतीची दयनीय अवस्था अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या स्तरापर्यंत पोहोचली असून, त्यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस ठाण्यातील एका कक्षामध्ये पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते तथा व्हिसलब्लोअर निलेश वाळुंज यांनी (दि.८) सार्वजनिक करून शासन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
या पाठपुराव्याला यश मिळाल्याने शिरूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीत लवकरच स्थलांतर होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. वाळुंज यांनी आपल्या तक्रारीत पावसामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी, महत्त्वाची शासकीय कागदपत्रे धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पोलीस ठाण्याच्या जीर्ण अवस्थेमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली होती.
जनहिताच्या तक्रारीची पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी तातडीने दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीची पाहणी केली. स्थलांतराच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही युद्धपातळीवर सुरू केली आहे.
शिरूर शहर व तालुक्यातील नागरिक अनेक वर्षांपासून नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीत स्थलांतराची अपेक्षा व्यक्त करत होते. आता वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट निर्देश मिळाल्याने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जनहिताच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करणारे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या तत्परतेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनानेही या विषयावर त्वरित हालचाली केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढेही अशाच संवेदनशीलतेने जनहिताचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





