Shirur News: विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासु, दिराविरोधात तक्रार
Shirur News: शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप

न्हावरे:- विवाहानंतर अवघ्या एक महिन्यापासून पती, सासु आणि दिराने वारंवार शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका ३६ वर्षीय विवाहितेने केला आहे. या प्रकरणी पिडित विवाहितेने शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पतीसह सासू आणि दिराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
विद्या महेश चव्हाण (वय ३६ )असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. त्या मूळच्या शिरुर तालुक्यातील तांदळी येथील असुन, त्यांचा विवाह १८ सप्टेंबर २०२० रोजी महेश श्रीकांत चव्हाण यांच्याशी झाला होता.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, विवाह झाल्यानंतर सुरुवातीचा सुमारे एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर त्यांचा छळ सुरु झाला. जानेवारी २०२५ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असताना पती महेश श्रीकांत चव्हाण, सासू रंजना श्रीकांत चव्हाण आणि दिर दिगंबर श्रीकांत चव्हाण यांनी वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पतीसोबत बदलापूर पश्चिमेकडील कैलासनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे वास्तव्यास असताना हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. आरोपींनी वारंवार दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सततच्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे आपले वैवाहिक जीवन असह्य झाल्याचे विवाहितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे.
याबाबत ९ जुलै २०२६ रोजी शिरुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा:





