Pune District : नीट कथित गैरव्यवस्थापनाविरोधात शिरूर बंद
Pune District : मोर्चाने अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा आणि हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करत तहसील कार्यालयाकडे प्रस्थान केले.

शिरूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे ’नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाच्या चौकशीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शिरूर शहरात गुरुवारी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराचा निषेध नोंदवत सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
मोर्चाची सुरुवात बाजार समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तिरंगा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे फलक तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन शेकडो युवक-युवती मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये माजी आमदार अॅड. अशोक पवार, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेविका डॉ. सुनिता पोटे, स्वप्नाली जामदार, दलितमित्र रमेश गायकवाड, रामभाऊ झेंडे, संजय बारवकर, मुजफ्फर कुरेशी, अॅड. किरण आंबेकर, अॅड. आदित्य मैड, खुशाल गाडे, अविनाश घोगरे, चेतन साठे, विशाल जोगदंड, असिफ शेख, मुश्ताक शेख, सुशांत कुटे, योगेश जामदार, दिपिका भालेराव, शशिकला काळे, सविता बोरुडे, डॉ. संदीप कोकरे, सचिन धाडीवाल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, डॉक्टर, वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चाने अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा आणि हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करत तहसील कार्यालयाकडे प्रस्थान केले. पोलिस ठाण्याजवळ आंदोलकांनी काही काळ ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात सहभागी झालेले डॉ. स्वप्नील भालेकर यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाबाबत केंद्र सरकारवर टीका करत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला. माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनीही शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक असल्याचे सांगत, देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली.
मोर्चाचे संयोजक अविनाश शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, देशाच्या भवितव्यासाठी विद्यार्थी शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी बळाचा वापर झाल्याचा आरोप होत असून, याविरोधात समाजाने एकजूट दाखविण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली साखरे यांनी केले. प्रमोद गायकवाड, मयुर भोसले, हिमांशू गायकवाड, कुणाल गायकवाड, फिरोज सय्यद, अॅड. स्वप्नील माळवे, अॅड. माया गायकवाड, हर्ष गायकवाड, विशाल ससाणे, हर्षल कांबळे, ब्रह्मा पठारे, प्रकाश डंबाळे आणि रियाज सय्यद यांनी मोर्चाच्या नियोजनात सहभाग घेतला. मोर्चाच्या शेवटी आंदोलकांच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांना निवेदन देण्यात आले.





