Pune ZP Election – सामान्य, कष्टकरी आणि तळागाळातील घटकांच्या प्रश्नांना न्याय देत विकासाची नवी दिशा देणार असून तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट सुजलाम-सुफलाम करून दाखवू, असा निर्धार भाजपच्या उमेदवार दिपाली गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे. रांजणगाव सांडस गावात आयोजित प्रचार दौऱ्यादरम्यान त्या मतदारांशी संवाद साधताना बोलत होत्या. या प्रचार दौऱ्यात दिपाली गव्हाणे यांनी मतदारांशी थेट संवाद साधून शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिला व युवकांच्या रोजगाराच्या संधींबाबत सखोल चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने विकासासाठी आवश्यक असणारा निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि निधीअभावी कोणतीही कामे रखडणार नाहीत. सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट गावागावांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्यावर आपला भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दिपाली गव्हाणे यांना वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कार्याचा वारसा आणि संस्कार लाभले आहेत. बापूसाहेब पठारे यांची सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि विकासाची कार्यपद्धती गव्हाणे यांच्या कार्यशैलीतही दिसून येत आहे. तसेच पुणे जिल्हा भाजप पदवीधर आघाडीचे अध्यक्ष राहुल गव्हाणे यांचे संघटन कौशल्य आणि प्रशासकीय समन्वयाचा अनुभव दिपाली गव्हाणे यांच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. उच्चशिक्षण, अभ्यासू वकृत्व आणि प्रशासनाशी संवाद साधण्याची क्षमता ही त्यांची बलस्थाने असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण होत आहे. सर्वांगीण विकासाची तयारी… पाणी व्यवस्थापन, दळणवळण सुधारणा, आरोग्य सेवांचे सक्षमीकरण आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराचे ठोस आराखडे मतदारांसमोर मांडले. बापूसाहेब पठारे यांची लोकाभिमुख कार्यपद्धती आणि राहुल गव्हाणे यांचे धोरणात्मक नियोजन यांच्या बळावर गटाचा सर्वांगीण विकास साधण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. या विश्वासार्ह नेतृत्वामुळे मतदारांचा दिपाली गव्हाणे यांना प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.