Suicide Case : तळेगाव ढमढेरे हादरलं! २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या; नेमकं कारण काय?
Suicide Case : शिक्षण घेत असतानाच उचललं टोकाचं पाऊल; तळेगाव ढमढेरे येथे महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येमुळे हळहळ.

Suicide Casec – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील गणेश मळा भागात एका २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकिता विलास ढमढेरे असे मृत युवतीचे नाव असून, ती वाघोली येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेची शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता ही घरात असताना तिची आई काही कामासाठी बाहेर दुकानात गेली होती. काही वेळाने आई घरी परतली असता तिला घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. तिने निकिताला वारंवार आवाज दिला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने आईने खिडकीतून डोकावून पाहिले असता, निकिताने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत दरवाजा तोडला आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी संजय रामभाऊ ढमढेरे (वय ५८ वर्षे, रा. गणेश मळा, तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलिसात खबर दिली आहे. निकिताने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील अधिक तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग करत आहेत.





