Shirur News: इंधन तुटवड्याच्या चर्चा फक्त अफवा! शिरूर तालुक्यात गॅसचा साठा सुरक्षित; तहसीलदारांचे स्पष्टीकरण
Shirur News: गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी, वितरणात अडथळा, जादा दर आकारणी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा तहसीलदारांनी दिला.

Shirur News: जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन व LPG गॅस पुरवठ्यावर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिरूर महसूल प्रशासनाने तत्परता दाखवली आहे. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील LPG गॅस वितरक, पुरवठा विभागाचे अधिकारी व संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
घरगुती ग्राहकांना प्राधान्य –
बैठकीत घरगुती व व्यावसायिक गॅस साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी यांचा आढावा घेण्यात आला. तहसीलदार म्हस्के यांनी वितरकांना स्पष्ट निर्देश दिले की नागरिकांपर्यंत वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने गॅस पोहोचणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. उपलब्ध साठ्याची अद्ययावत माहिती नियमितपणे प्रशासनाला देण्याचे व पुरवठ्यात अडचण आल्यास तत्काळ कळवण्याचे निर्देशही देण्यात आले. हॉटेल, खानावळी, केटरिंग सेवा व लहान व्यावसायिक आस्थापनांच्या गरजाही लक्षात घेऊन सुसूत्र नियोजन ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
अफवांवर विश्वास ठेवू नका –
युद्धामुळे गॅस सिलिंडर किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन नायब तहसीलदार व्हणमाने यांनी केले. तालुक्यात सध्या पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून पॅनिक बुकिंग न करता गरजेनुसारच बुकिंग करावे, असेही त्यांनी सांगितले.
काळाबाजाराविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा –
गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी, वितरणात अडथळा, जादा दर आकारणी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा तहसीलदारांनी दिला. कुठेही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले. एकूणच युद्धजन्य पार्श्वभूमीवर शिरूर प्रशासनाने दाखवलेली सतर्कता दिलासादायक असून नागरिकांच्या दैनंदिन गरजांबाबत प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.





